लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अकोला, अमरावती व बुलडाणा जिल्ह्यातील खारपाणपट्टय़ातील प्रकल्पाच्या कामास विलंब होत असल्यामुळे शेतकरी प्रतीक्षेत आहेत. सदर प्रकल्प कधी पूर्णत्वास जातील, असा सवाल विधान परिषद सदस्य गोपीकिशन बाजोरिया यांनी सभागृहात उपस्थित केला असता खारपाणपट्टय़ातील प्रकल्पांची आखणी व अंमलबजावणीचे नियोजन टप्प्यात असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांनी दिली. अकोला, अमरावती व बुलडाणा जिल्ह्यातील १६ तालुक्यांमध्ये खारपाणपट्टय़ाचा भाग समाविष्ट होतो. खारपाणपट्टय़ातील ४ लाख १६ हजार हेक्टर जमिनीचा विकास करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या भागात नेमक्या कोणत्या विकास कामांचा समावेश असून, प्रकल्पांचे कामकाज कधी पूर्ण होईल, असा सवाल विधिमंडळात आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी उपस्थित केला. रखडलेल्या प्रकल्पांची शासन स्तरावरून चौकशी झाली का, असा प्रश्न उपस्थित करून आ. बाजोरिया यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. खारपाणपट्टय़ातील प्रकल्पांचा निर्णय जुलै २0१६ मध्ये घेण्यात आला होता. प्रकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी त्यांची आखणी व अंमलबजावणीचे नियोजन अंतिम टप्प्यात असल्याची माहिती कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी दिली.
पुलांच्या कामाला विलंब का?
- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ च्या चौपदरीकरणाचे काम सुरू झाले आहे. मागील काही दिवसांपासून चौपदरीकरणाच्या कामाची गती मंदावली असून, समृद्धी महामार्गाच्या कामामुळे हा परिणाम झाला का, असा प्रश्न आ. गोपीकिशन बाजोरिया यांनी उपस्थित केला.
- अमरावती ते अकोला ते बाळापूर-खामगाव ते चिखलीपर्यंतच्या मार्गाचे चौपदरीकरण होत असले तरी महामार्गावर आवश्यक ठिकाणी असणार्या पुलांचे काम अद्यापही सुरू झाले नाही. रस्त्याचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण होत असतानाच पुलांचे कामही सुरू होणे गरजेचे असल्याचा मुद्दा आ. बाजोरिया यांनी उपस्थित केला.
- त्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम २0१९ पर्यंत पूर्ण होणार असल्याचे सांगितले. तसेच पुलांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला दिले.