अकोला : जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ग्रामपंचायतींची अंतिम मतदार यादी सोमवार, दि. १४ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. मतदार यादीसंदर्भात प्राप्त झालेल्या हरकती जिल्ह्यातील संबंधित तहसील कार्यालयामार्फत निकाली काढण्यात आल्या आहेत.
एप्रिल ते डिसेंबरपर्यंत मुदत संपलेल्या जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील २२५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १५ एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार आहे. २२५ ग्रामपंचायतींची प्रारूप मतदारयादी ७ डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, यादीसंदर्भात आक्षेप व हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार मतदार यादीसंदर्भात प्राप्त झालेल्या हरकती संबंधित तहसील कार्यालयांकडून निकाली काढण्यात आल्या असून, ग्रामपंचायतींची अंतिम मतदार यादी १४ डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
‘या’ ठिकाणी प्रसिद्ध होणार अंतिम मतदार यादी !
जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींची अंतिम मतदार यादी दि. १४ डिसेंबर रोजी प्रशासनामार्फत प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तहसील कार्यालये, पंचायत समिती व संबंधित ग्रामपंचायत कार्यालय इत्यादी ठिकाणी ग्रामपंचायतींची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.