अकोला: ऑगस्ट ते डिसेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींची अंतिम प्रभाग रचना सोमवार, २ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जाहीर करण्यात येणार आहे. अंतिम प्रभाग रचनेत ग्रामपंचायतींचे प्रभाग व प्रवर्गनिहाय आरक्षण निश्चित होणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींचे कोणते प्रभाग कोणत्या प्रवर्गासाठी निश्चित होणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
ऑगस्ट ते डिसेंबरपर्यंत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील सातही तालुक्यातील २२४ ग्रामपंचायतींची निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्हा प्रशासनामार्फत ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेचे काम पूर्ण करण्यात आले आहे. संबंधित ग्रामपंचायतींची अंतिम प्रभाग रचना २ नाेव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रसिध्द करण्यात येणार आहे. अंतिम प्रभाग रचनेत ग्रामपंचायतींचे प्रभागनिहाय अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग इत्यादी प्रवर्गनिहाय आरक्षण निश्चित होणार आहे. त्यानुषंगाने अंतिम प्रभाग रचनेत कोणता प्रभाग कोणत्या प्रवर्गासाठी निश्चित होतो, याबाबत ग्रामस्थांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
प्रभाग रचना जाहीर होणाऱ्या
अशा आहेत ग्रामपंचायती!
तालुका ग्रा.पं.
तेल्हारा ३४
अकोट ३८
मूर्तिजापूर २९
अकोला ३५
बाळापूर ३८
बार्शीटाकळी २७
पातूर २३
...........................................
एकूण २२४