अकोला : कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरातील दीक्षांत सभागृहात २०० खाटांचे जम्बो कोविड रुग्णालय अखेर मंगळवारी कार्यान्वित करण्यात आले असून, कोरोना बाधित १५ रुग्णांवर उपचार सुरु करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी जिल्हा प्रशासनामार्फत अकोल्यातील डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरातील दीक्षांत सभागृहात २०० खाटांचे जम्बो कोविड रुग्णालय सुरु करण्यास जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दहा दिवसांपूर्वी प्रशासकीय मान्यता दिली. या कोविड रुग्णालयासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत (डीपीसी) १ कोटी ४३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासह ऑक्सिजन बेडची सुविधा या कोविड रुग्णालयात उपलब्ध करण्यात आली आहे. आरोग्य यंत्रणामार्फत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्यानंतर अखेर २०० खाटांचे जम्बो कोविड रुग्णालय ११ मे पासून कार्यान्वित करण्यात आले. पहिल्या दिवशी (११ मे रोजी) या कोविड रुग्णालयात कोरोना बाधित १५ रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, या रुग्णांना ऑक्सिजन बेडची उपचार सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे, असे अकोल्याचे उपविभागीय दंडाधिकारी डाॅ. निलेश अपार यांनी सांगितले.