अकोला: थकीत वीज देयकाच्या रकमेचा तीन दिवसांत भरणा करणार असल्याचे पत्र जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने दिल्यानंतर, जिल्ह्यातील ६४ खेडी व ८४ खेडी या दोन प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा खंडित केलेला वीजपुरवठा अखेर शुक्रवारी वीज वितरण कंपनीमार्फत पूर्ववत केला. त्यामुळे दोन्हा पाणीपुरवठा योजनांतर्गत गावांत निर्माण झालेला जलसंकटाचा प्रश्न निकाली लागला आहे.
जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील खांबोरा येथील ६४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे फेब्रुवारी अखेरपर्यंत १ कोटी ४४ लाख रुपये आणि अकोट येथील ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे ७५ लाख रुपयांचे वीज देयक थकीत आहे. थकीत वीज देयकांचा जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने भरणा केला नसल्याने, खांबोरा येथील ६४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा १६ मार्च रोजी वीज वितरण कंपनीमार्फत खंडित करण्यात आला होता. त्यानंतर, अकोट येथील ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचाही वीजपुरवठा १८ मार्च रोजी खंडित करण्यात आला होता. वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने, दोन्हा योजनांतर्गत गावांचा पाणीपुरवठा बंद झाला होता. या पार्श्वभूमीवर दोन्ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या थकीत वीज देयकांच्या रक्कोचा दोन, तीन दिवसांत भरणा करण्यात येणार असून, योजनांचा खंडित केलेला वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे पत्र जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी वीज वितरण कंपनीच्या अकोला मंडळ अधीक्षक अभियंत्यांना १९ मार्च रोजी देण्यात आले. त्यानंतर, खांबोरा ६४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा खंडित केलेला वीजपुरवठा १९ मार्च रोजी दुपारी वीज वितरण कंपनीमार्फत पूर्ववत सुरू करण्यात आला, तसेच ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठाही सायंकाळी पूर्ववत करण्यात आला. वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आल्याने दोन्ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत गावांमध्ये निर्माण झालेला जलसंकटाचा प्रश्न निकाली लागला आहे.
थकीत वीज देयकाच्या रक्कमेचा भरणा करण्यात येणार आहे. त्यामुळे दोन प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा खंडित केलेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यासंदर्भात वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांना पत्र दिल्यानंतर वीज वितरण कंपनीमार्फत ६४ खेडी व ८४ खेडी या दोन प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा शुक्रवारी पूर्ववत करण्यात आला. त्यामुळे दोन्ही योजनांतर्गत गावांचा पाणीपुरवठा शनिवारपासून सुरू करण्यात येणार आहे.
अनिस खान
प्रभारी कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद,
प्रभारी