अकोला: महापालिकेमध्ये कार्यरत सफाई कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये आर्थिक घोळ केल्याप्रकरणात सिटी कोतवाली पोलिसांनी अखेर पेन्शन शाखेचे सेवानिवृत्त लिपिक अशोक गणेशराव सोळंके यांच्याविरूद्ध मंगळवारी रात्री उशिरा फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. परंतु, या सर्व प्रकरणात केवळ अशोक सोळंके हेच आरोपी आहेत की, आणखी काही आरोपी आहेत. याचा तपास कोतवाली पोलिस करणार आहेत.
कोतवाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १ जानेवारी २०१९ ते ३१ डिसेंबर २०२१ दरम्यान महापालिकेमध्ये अशोक सोळंके यांनी सेवेत नसलेल्या लोकांच्या खात्यात महापालिकेचे पैसे कापून, नंतर ते पैसे काढून घेतले होते. असे एकूण १ कोटी २७ लाख २६,९२७ रुपयांचा आर्थिक अपहार केला असल्याची तक्रार महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी अतुल दलाल बांनी सिटी कोतवाली पोलिसात दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार २५ जून रोजी आरोपी अशोक सोळंके विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हयाचा तपास पोलिस निरीक्षक सुनिल वायदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक बि.सी. रेघीवाले, पोहेकों आतिष बावस्कर, पोकों नवलकार करीत आहेत. याप्रकरणाबाबत अनेकांनी महापालिकेमध्ये अनेकदा माहिती मागितली. परंतु महापालिका प्रशासनाने ही माहिती दडवून ठेवली. पेन्शन विभागातील अपहाराच्या प्रकरणाची चर्चा सुरू असताना, महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. सुनील लहाने यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
महापालिकेच्या पेन्शन विभागात १ कोटी २७ लाख २६ हजार ९२७ रुपयांची अनियमितता झाल्याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी अशोक गणेशराव सोळंके यांच्याविरूद्ध कलम ४०९, ४२० नुसार गुन्हा दाखल केला आहे. पेन्शन विभागातील घोटाळ्यात सेवानिवृत्त लिपिक अशोक सोळंके यांचा एकट्याचा सहभाग नाहीतर त्यांच्यासोबत इतर काही लोकांचा सहभाग आहे. त्यांच्या सखोल चौकशीतून आणखी अनेक धक्कादायक नावे समोर येण्याची शक्यता आहेत.
रजा रोखीकरण व ग्रॅज्युटीवरही डल्लामहापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या रजा रोखीकरणात व ग्रॅज्युटीच्या रक्कमेवरही मोठ्या प्रमाणात डल्ला मारण्यात आला आहे. अनेक कर्मचाऱ्यांना अंधारात ठेऊन त्यांचे रजा रोखीकरण परस्पर करण्यात आले. इतकेच नाही तर काही कर्मचाऱ्यांची परस्पर ग्रॅज्युटीची रक्कम काढत ती स्वतःच्या व इतर कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात वळती करण्यात आली. त्यामुळे या सर्व प्रकरणाची सखाेल चौकशी होण्याची गरज आहे.