अकोला: एका व्यापार्याला ५0 लाख रुपये व्याजाने दिल्यानंतर अव्वाच्या सव्वा व्याज लावून त्याला १ कोटी २0 लाख रुपयांची मागणी करून आणि जबर दुखापत करण्याची धमकी दिल्याप्रकरणातील आरोपी माजी नगरसेवक अलियार खान ऊर्फ अल्लू पहेलवान याला कोतवाली पोलिसांनी गुरुवारी नागपुरातून ताब्यात घेतले. शहरातील एक व्यापारी व त्याच्या सहकार्याने अल्लू पहेलवान याच्याकडून जानेवारी २0१३ मध्ये व्याजाने ५0 लाख रुपये घेतले होते. व्याजाची टक्केवारीही ठरली होती. रोख रक्कम व त्याचे व्याज द्यायला तयार असणार्या या व्यापार्याला ५0 लाख रुपयांचे चक्रीवाढ व्याज लावून त्याला १ कोटी २0 लाख रुपये देण्याची मागणी अलियार खान ऊर्फ अल्लू पहेलवान, फिरोज खान, जावेद खान, बुढन ऊर्फ नियामत खान, आझाद खान आणि गजानन कांबळे यांनी केली. एवढी रक्कम न दिल्यास हल्ला करण्याची धमकी दिली होती. दरम्यान अल्लू पहेलवान याच्यासह त्याची मुले फरार झाली होती. त्यानंतर अल्लू व त्याच्या मुलांना पोलिसांनी तडीपार केले होते. अल्लूने जामीन मिळविण्यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता; परंतु त्याचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. त्यानंतर अल्लूने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे जामिनासाठी अर्ज केला. तो नागपुरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी त्याला उच्च न्यायालयाच्या परिसरातून ताब्यात घेतले. उशिरा रात्री त्याला अकोल्यात आणून अटक केली. ही कारवाई रामदासपेठचे एपीआय शिरीष खंडारे, कोतवालीचे पीएसआय शेख हाशम यांनी केली.
अखेर अल्लू पहेलवानला नागपुरात अटक
By admin | Published: October 31, 2014 1:27 AM