अकाेला : सात महिन्यांपूर्वी पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत पराभूत झालेले शिवसेनेचे माजी आमदार गाेपीकिशन बाजाेरिया व त्यांचे पुत्र आमदार विप्लव बाजाेरिया अखेर गुरुवारी शिंदे गटात सामील झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाजाेरिया पिता, पुत्रांनी व युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप यांनी प्रवेश केला. शिवसेना नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बंडखाेरी करीत भाजपसाेबत हात मिळवणी केली. या घडामाेडीमुळे राज्यात माेठा भूकंप आला. दरम्यान, शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या गटात सामील हाेण्यासाठी पक्षातील पदाधिकाऱ्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. स्थानिक पातळीवरही अकाेला, वाशिम व बुलडाणा विधान परिषदेच्या मतदारसंघात तब्बल तीनवेळा निवडून आलेल्या माजी आमदार गाेपीकिशन बाजाेरिया यांनी गुरुवारी हिंगाेली, परभणी मतदारसंघाचे विद्यमान आमदार विप्लव बाजाेरिया यांच्यासह मुंबईत शिंदे गटात प्रवेश केला. नुकत्याच डिसेंबर महिन्यात पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी गाेपीकिशन बाजाेरिया यांना चाैथ्यांदा निवडणूक रिंगणात उतरविले हाेते. त्या निवडणुकीत बाजाेरियांचा धक्कादायक पराभव झाला. या पराभवाला पक्षांतर्गत राजकारण कारणीभूत असल्याचा आराेप त्यावेळी बाजाेरिया यांनी केला हाेता. तेव्हापासून ते अस्वस्थ असल्याचे बाेलले जात हाेते.
जिल्हा संपर्कप्रमुख पदी नियुक्ती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी आमदार बाजाेरिया यांच्याकडे अकाेला जिल्ह्याच्या संपर्क प्रमुखपदाची धुरा साेपवली आहे. यावेळी शिंदे गटात युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप, माजी नगरसेवक शशिकांत चाेपडे व इतर शिवसैनिकांनी प्रवेश केला.
बैठकीला हजेरी लावणाऱ्यांची पाठ
शिंदे गटात सामील हाेण्याच्या अनुषंगाने गाेपीकिशन बाजाेरिया यांनी १९ जुलै राेजी एका बैठकीचे आयाेजन केले हाेते. त्या बैठकीत माजी सहसंपर्क प्रमुख श्रीरंग पिंजरकर, शहर संघटक तरुण बगेरे, संताेष अनासने, ज्याेत्स्ना चाेरे, नीलिमा तिजारे, सुनीता श्रीवास, राजेश्वरी शर्मा आदी उपस्थित हाेते. प्रत्यक्षात या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत उपस्थित राहणे कटाक्षाने टाळले.