अकोला: सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत राज्यातील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेतील रेशनकार्डधारकांना अखेर मका आणि ज्वारीचे वितरण अखेर ५ मार्चपासून सुरू करण्यात आले आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत प्राधान्य गट आणि अंत्योदय अन्न योजनेंतर्गत रेशनकार्डधारकांना दरमहा रास्तभाव दुकानांमधून धान्याचे वितरण करण्यात येते. त्यामध्ये गव्हाचे वितरण कमी करून प्राधान्य गटातील रेशनकार्डधारकांना प्रतिव्यक्ती एक किलो मका आणि अंत्योदय अन्न योजनेंतर्गत रेशनकार्डधारकांना प्रतिकुटुंब १५ किलो ज्वारी व ५ किलो मका वितरित करण्याचा निर्णय शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत गत जानेवारीमध्ये घेण्यात आला. त्यानुसार राज्यातील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थी रेशनकार्डधारकांना गत फेब्रुवारीपासून मका व ज्वारीचे वितरण करायचे होते; मात्र धान्याची उचल झाली नसल्याने गत फेब्रुवारीमध्ये राज्यातील रेशनकार्डधारकांना मका व ज्वारीचे वितरण सुरु करण्यात आले नाही. धान्याची उचल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्यातील सर्वच जिल्ह्यात ५ मार्चपासून प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेतील रेशनकार्डधारकांना मका व ज्वारीचे वितरण रास्तभाव दुकानांमधून सुरु करण्यात आले. त्यामध्ये रेशनकार्डधारकांना एक रुपया प्रतिकिलो दराने मका व ज्वारीचे वितरण सुरु करण्यात आले आहे.
भारतीय खाद्य निगमच्या गोदामांतून धान्याची उचल केल्यानंतर ५ मार्चपासून जिल्ह्यात प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेंतर्गत रेशनकार्डधारकांना मका व ज्वारीचे वितरण सुरू करण्यात आले आहे.
बी.यू. काळे
जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला.