अतुल जयस्वाल, अकोला : जिल्ह्याच्या आपातापा,म्हैसांग परिसरासह मूर्तिजापूर तालुक्यात चक्रीवादळासह झालेल्या अवकाळी पावसामुळे मंगळवारी (११ जून) खंडित झालेला ५५ गावांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात महावितरणला यश आल्याची माहिती कार्यकारी अभियंता विजयकुमार कासट यांनी दिली.जिल्ह्यात मंगळवार,११ जून रोजी संध्याकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने अकोला ग्रामीण विभाग अंतर्गत अकोला ग्रामीण उपविभाग व मूर्तिजापूर उपविभागातील अनेक गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर आणि अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. त्यामुळे वादळ थांबताच कार्यकारी अभियंता विजयकुमार कासट यांच्या नेतृत्वात तसेच उपकार्यकारी अभियंता पाल अग्रवाल, मनोज खांडरे यांच्या पुढाकाराने दुरुस्ती कार्याला युद्धस्तरावर गती देण्यात आली. शेकडो किलोमीटर वीज वाहिन्यांचे पोल टू पोल पेट्रोलिंग करून नीज वाहिनींच्या उभारणीसह तांत्रिक दोष दूर करण्यात आले. शक्य त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्थेचा वापर करून २४ तासात वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.
अकोला तालुक्यात झालेले नुकसान
अकोला तालुक्यातील मुख्यत्वे आपातापा उपकेंद्रास विद्युत पुरवठा करणाऱ्या ३३ केव्ही विद्युत वाहिनीचे १५ पोल जमीनदोस्त झाले होते. त्याचप्रमाणे ११ केव्ही आपातापा, ११ केव्ही म्हैसांग, ११ केव्ही रामगाव फिडरवरील १२ पोल तसेच जवळपास ४० लघुदाब वाहिन्यांचे पोल तुटल्याने ३३ केव्ही आपातापा उपकेंद्रातून विद्युत पुरवठा होत असलेल्या आपातापा, घुसर, म्हैसांग इत्यादी गावांसह एकूण ३२ गावांचा विद्युतपुरवठा खंडित झाला होता.
मूर्तिजापूर तालुक्यात झालेले नुकसान
मूर्तिजापूर उपविभागातील दुर्गवाडा विद्युत वितरण केंद्रांतर्गत ११ केव्ही भटोरी विद्युत वाहिनीचे ८ पोल व लघुदाब वाहिनीचे ३५ पोल जमीनदोस्त झाले होते. त्यामुळे भटोरी वाहिनीवरील ७ गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. तसेच दुर्गवाडा व माना विद्युत वितरण केंद्रांतर्गत ३३ केव्ही दुर्गवाडा उपकेंद्र येथून निघणाऱ्या ११ केव्ही कोलसारा फिडरचे २ पोल तुटल्याने ६ गावे अंधारात गेली होती. तसेच ग्रामीण २, जामठी व कुरुम विद्युत वितरण केंद्रांतर्गत ५१ लघुदाब वाहिनींचे पोल तुटल्यामुळे १० गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता.