पांढुर्णा: पातूर तालुक्यातील पिंपळडोळीनजीक पूल खरडून गेल्याने वाहतूक ठप्प होऊन नऊ गावांचा संपर्क तुटला होता. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच संबंधित विभागाने दखल घेऊन पुलावर दि. २४ ऑगस्ट रोजी मुरूम टाकला आहे. त्यामुळे वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे.
जिल्ह्याच्या टोकावर पातूर तालुक्यातील पिंपळडोळीसह परिसरामध्ये दि. २२ ऑगस्ट रोजी मुसळधार पावसामुळे अनेक रस्त्याला तडे गेले असून, अनेक पूल खरडून गेले आहेत. पिंपळडोळी येथील निर्गुणा नदीवर असलेला पूल खरडून गेल्याने परिसरातील नऊ गावांचा संपर्क तुटला होता. त्यामुळे पूर्ण दिवस वाहतूक ठप्प होती. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण पूल खरडून गेलेल्या पुलाचे काम त्वरित सुरू केले आहे. पिंपळडोळी रस्ता हा परिसरातील १० गावांना जोडणारा आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या पावसामुळे पूल खरडून गेला होता. दि. २४ ऑगस्ट रोजी ‘लोकमत’ने बातमी प्रकाशित करताच सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण पुलावर मुरूम टाकला आहे. त्यामुळे गावातील वाहतूक सुरळीत झाली आहे.