खेट्री : पातूर तालुक्यातील सावरगाव येथील ग्रामपंचायतचे तत्कालीन सचिव पी. पी. चव्हाण यांनी आर्थिक व्यवहार करून गावातील जागा एकाच वारसाच्या नावाने केल्याचा आरोप रामचंद्र नारायण चव्हाण यांनी ३१ डिसेंबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केला होता. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने १ जानेवारी रोजीच्या अंकात प्रकाशित करताच संबंधित विभाग खडबडून जागा झाला व या प्रकरणी पातूरचे गट विकास अधिकारी अनंता लव्हाळे यांनी सावरगाव ग्रामपंचायतचे सध्या कार्यरत असलेले सचिव सर्जे यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश ८ जानेवारी रोजी पत्राद्वारे दिले आहेत.
सावरगाव येथील रामचंद्र नारायण चव्हाण यांचे वडील नारायण अमरसिंग चव्हाण यांचा १९९६-९७ वर्षी मृत्यू झाला होता. त्याच्या नावाने गावात तीन हजार २३४ स्क्वेअर फुट जागा होती. वडिलांच्या मृत्यूनंतर वारसाची समंती लेखी घेऊन एका वारसाच्या नावाने जागा करणे अपेक्षित होते, परंतु सावरगाव ग्रामपंचायतमध्ये तत्कालीन सचिव चव्हाण हे २०१३ ते २०१८ या कार्यकाळात कार्यरत असताना एका वारसाकडून आर्थिक व्यवहार करून त्याच्या नावाने जागा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने रामचंद्र नारायण चव्हाण यांनी ३१ डिसेंबर रोजी थेट मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, पालकमंत्र्यांना निवेदन सादर केले होते. चौकशी करून तत्कालीन सचिव चव्हाण यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करावी अन्यथा बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला होता.
--------------------
सचिवाला राजकीय पाठबळ असल्याचा आराेप
ग्रामपंचायतचे तत्कालीन सचिव चव्हाण यांच्याविरुद्ध ग्रामस्थांनी अनेक तक्रारी केल्या, परंतु तत्कालीन सचिवाला राजकीय पाठबळ असल्याचा आराेप करून तक्रारीची थातूरमातूर चौकशी करून प्रकरण दडपून कारवाई हाेत नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे.
-----------------------------
सावरगाव ग्रामपंचायतीचे तत्कालीन सचिव चव्हाण यांनी आर्थिक व्यवहार करून एका वारसाच्या नावाने जागा केलेल्याबाबतची तक्रार प्राप्त झाली असून, त्याबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याबाबतचे पत्र काढण्यात आले आहे.
अनंता लव्हाळे, गटविकास अधिकारी, पातूर