लोकमत इफेक्ट
खेट्री : आलेगाव वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत शिरपूर परिसरात वृक्षांची कत्तल होत असून, याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. याबाबत ‘लोकमत’ने २३ जानेवारी रोजीच्या अंकात प्रकाशित करता वन विभाग खडबडून जागा झाला. आलेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश नालिंदे यांच्या आदेशानुसार वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शिरपूर परिसर पिंजून काढला असता, वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड होत असल्याचे उघडकीस आले.
जिल्ह्यातील शिरपूर व बुलडाणा जिल्ह्यातील शहापूर दोन्ही गावाच्या सीमेवरून मन नदी वाहते. आलेगाव वन परिक्षेत्र अंतर्गत शिरपूर परिसरातील मन नदीच्या काठावरील शेतशिवरात मोठ्या लिंबाच्या झाडांची कत्तल करून अवैध वाहतूक करण्यात येत असल्याचे चित्र आहे. मन नदीच्या काठावर असलेल्या शेतशिवारात भरदिवसा वृक्षतोड करून लाकूड माफिया अवैध वाहतूक करीत आहे. त्यामुळे वन व महसूल विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत २३ जानेवारी रोजी ‘लोकमत’ने बातमी प्रकाशित करताच वन विभागाला जाग येऊन काही कर्मचाऱ्यांनी परिसरात शोध घेतला. यावेळी अवैध वृक्षतोड होत असल्याचे दिसून आले.
काही शेतकऱ्यांना बजावली नोटीस
वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शिरपूर परिसरात शोध घेतला असता वृक्षांची कत्तल होत असल्याचे उघड झाले. त्यामुळे वृक्षतोड अधिनियम १९६४ अंतर्गत चौकशीसाठी २५ जानेवारी रोजी आलेगाव वनपरिक्षेत्र कार्यालयात सातबारासह हजर राहण्याबाबत काही शेतकऱ्यांना नोटीस बजावली आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार असल्याचे संकेत आहेत.