अकोला : तेल्हारा तालुक्यातील पाथर्डी गावात वीज बिल वसुलीच्या मोहिमेवर असताना दारु पिऊन ग्राहकांशी वाद घातल्याचा आरोप असलेले महावितरणच्या अकोट विभागातील (दक्षिण खेडे) सहायक अभियंता अनिल सरकटे यांना अखेर सोमवारी निलंबित करण्यात आले. दोन दिवसांपूर्वी सरकटे यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्याची दखल घेत तसेच इतरही कारणांमुळे सरकटे यांना निलंबित करण्यात आल्याचे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. अनिल सरकटे हे १७ ऑगस्ट रोजी दुपारी जनमित्रांसह पाथर्डी येथे वीजबिल वसुली मोहिमेवर गेले होते. यावेळी त्यांनी एका ग्राहकासोबत वाद घातला. यावेळी सरकटे हे मद्यप्राशन केलेले होते, असा आरोप आहे. गावकऱ्यांसोबत वाद घातल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. यामुळे महावितरणची प्रतिमा मलीन झाल्याचा ठपका ठेवत अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांच्या आदेशान्वये सरकटे यांना निलंबित करण्यात आले.
याशिवाय वसुलीच्या कामात निष्काळजीपणा करणे, कंपनीची भ्रमणध्वनी बंद ठेवणे, ग्राहकांकडून वीजबिलाची रक्कम वसूल करून कार्यालयात जमा न करणे, नादुरुस्त फिडरवरील ब्रेकडाऊन काढण्यास विलंब करणे, ग्राहकांना नवीन वीज जोडण्या व इतर सेवा देण्यात टाळटाळ करणे आदी गैरकृत्यांचाही ठपका ठेवण्यात आला आहे. वरिष्ठांनी वारंवार लेखी व तोंडी आदेश दिल्यानंतरही सुधारणा न झाल्यामुळे अखेर सोमवारी सरकटे यांना निलंबित करण्यात आले. पुढील आदेशापर्यंत ते निलंबित राहणार आहेत.