लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा परिषदेत नियुक्ती तसेच आंतर जिल्हा बदलीने रुजू झाल्यानंतर जात वैधता सादर न करणार्या २0 शिक्षकांना बडतर्फ करण्याचे तसेच ११ शिक्षकांना मूळ जिल्हा परिषदेत परत करण्याचा आदेश सोमवारी बजावण्यात आला. त्याचवेळी ऐनवेळी जात वैधता सादर करणार्या तिघांच्या प्रमाणपत्राची पडताळणी करणे, आठ निमशिक्षकांच्या सेवा शर्ती तपासून पुढील कारवाई केली जाईल, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी सांगितले.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती यांनी जात वैधता सादर न करणार्या ४४ पैकी २३ शिक्षकांना बडतर्फ, तर आंतर जिल्हा बदलीने राखीव जागेवर पदस्थापना मिळालेल्या १२ शिक्षकांना मूळ जिल्हय़ात परत पाठवण्याचा आदेश ३ व ९ ऑक्टोबर रोजी दिला. त्यामध्ये नऊ उर्दू माध्यमाचे शिक्षक आहेत. आदेशाला शिक्षकांनी न्यायालयात आव्हान दिल्यास जिल्हा परिषदेची बाजू ऐकून घ्यावी, यासाठी कॅव्हेट दाखल करण्यात आले. सोबतच बिंदूनामावलीही अंतिम करण्यात आली. त्यानंतर सोमवारी आधी आदेश झालेल्या २३ ऐवजी २२ मराठी माध्यमांच्या शिक्षकांपैकी ११ जणांना बडतर्फीचा आदेश देण्यात आला. निमशिक्षक म्हणून रुजू झालेल्या आठ शिक्षकांचा आदेश प्रलंबित आहे. त्यांच्या सेवाशर्तीची पडताळणी केल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. तीन शिक्षकांनी ४ ऑक्टोबर रोजी जात वैधता सादर केली. त्यांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी होईपर्यंत आदेश राखून ठेवण्यात आला. विशेष म्हणजे, उर्दू माध्यमाच्या सर्वच नऊ शिक्षकांनाही बडतर्फीचा आदेश देण्यात आला.
बडतर्फीचा आदेश दिलेले शिक्षकमराठी माध्यमाच्या बडतर्फ झालेल्या ११ शिक्षकांमध्ये पातूर पंचायत समितीमधील अनिता सूरजसिंह बयस, बाश्रीटाकळी-नरेंद्र श्रीकृष्ण घोडके, मूर्तिजापूर- विनायक रामदास गीते, अशोक गोपालसिंह चुंगडे, उज्ज्वला बाबाराव नाईक, अकोट- सुनील पंढरी सिरसाट, विद्या सुधाकर मानकर, शिवदास रामरतन आढे, बाळापूर- स्वाती शरद कुबल, अकोला - सचिन रामधासिंग राजपूत, तेल्हारा- विजय पांडुरंग वाकोडे. उर्दू माध्यमांचे मूर्तिजापूर- मो.तसद्दूक मो.गौस, अकोट- शमिमोद्दीन अलिमोद्दीन, मुजम्मील मुजफ्फर जमादार, अ.शकिल अ.जलिल, मोहसिन बेग अब्बास बेग, अकोला- शोएब अहमद मलिक, फारूख खान इब्राहिम खान, तेल्हारा- मो.सलिम मो.इकबाल, शे.अमिर शे.लतिफ यांचा समावेश आहे.
मूळ जिल्ह्यात परत केलेले शिक्षकआंतर जिल्हा बदलीने आलेले वसंत एकनाथ कोलटके, संजय ओंकार एकिरे, वासुदेव भाऊराव चिपडे, गोपाल देवीदास इंगळे, किसन श्रीराम पिंपळकर, गजानन परसराम नवलकार, किरण रामदास लहाने, योगिता मारोतराव खोपे, गीताबाली आनंदराव डेरे, गजानन डिगांबर खेडकर, किरण विश्वास पाटील.
बिंदू नामावलीत घोळामुळे कारवाईजिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षक आस्थापनेची संवर्गनिहाय बिंदूनामावली २00७ मध्ये तयार करण्यात आली. त्यामध्ये प्रचंड गोंधळ करण्यात आला. त्यामध्ये आतापर्यंत अनुसूचित जमाती, विशेष मागास प्रवर्ग, विमुक्त जाती-अ, भज-ब, भज-ड, इतर मागास प्रवर्ग या सर्व प्रवर्गात सरळ सेवेने किंवा पदोन्नती दिलेल्या कर्मचार्यांच्या नियुक्तीसंदर्भात निवड समितीने केलेल्या प्रवर्गनिहाय याद्या, नियुक्ती आदेश, जात वैधता प्रमाणपत्र, तसेच आंतरजिल्हा बदलीने नियुक्ती आदेश, एसटीच्या पदावर गैरआदिवासी कर्मचार्यांची नियुक्ती, ज्या विशेष मागास प्रवर्गातील कर्मचार्यांनी जात वैधता सादर केली नाही, १५ जून १९९५ नंतर विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांना एसटी प्रवर्गात नियुक्ती दिली. त्यांच्या सेवा समाप्त करणे, तसेच जात वैधता प्रमाणपत्र न घेताच नियुक्ती देणार्या सर्व संबंधितांवर आता अंतिम कारवाई होत आहे.