लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोनाच्या संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी राज्यात ठिकठिकाणी निर्जंतुकीरणासाठी व्यक्ती किंवा समूहाच्या अंगावर रसायनांची फवारणी करण्यासाठी व्हॅन, डोम, अथवा टनेल यांचा वापर केला जात आहे; मात्र त्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. या रसायनामुळे व्यक्तीला अपाय होऊ शकतो, म्हणून फवारणीसाठी टनेल किंवा डोमचा वापर करू नये, अशी सूचना आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी दिल्या आहेत.कोरोना विषाणूपासून बचावासाठी राज्यात ठिकठिकाणी ‘सॅनिटायझर टनेल’चा वापर वाढला आहे; परंतु त्यामध्ये निर्जंतुकीकरणासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या द्रावणात ‘सोडियम हायपोक्लोराइट’ची तीव्र मात्रा मानवी शरीरासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे ‘सॅनिटायझर टनेल’चा वापर करताना जपूनच केलेला बरा, वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यावरून ‘लोकमत’ ने १८ एप्रिलच्या अंकात वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्तावर केंद्रीय आरोग्य विभागाच्या आदेशाने शिक्कामोर्तब झाले आहे. मॉल्स, पोलीस स्टेशन, शासकीय कार्यालये, रुग्णालयांसह इतर ठिकाणीही या टनेलची संख्या झपाट्याने वाढत आहे. टनेलमध्ये निर्जंतुकीकरणासाठी उपयोगात आणल्या जाणाºया द्रावणात ‘सोडियम हायपोक्लोराइट’चाही वापर केला जात आहे; परंतु ‘सोडियम हायपोक्लोराइट’चा अतिरेक मानवी शरीरासाठी घातकदेखील ठरू शकतो. हाच संदेश केंद्रीय आरोग्य विभागाच्या या सूचनेनंतर रविवारी या बाबत सर्व जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य अधिकारी, महापालिका आरोग्य अधिकारी यांना पत्र पाठवून राज्यात या प्रकारच्या यंत्रणांचा वापर न करण्याबाबत राज्याच्या आरोग्य विभागाने कळविले आहे.राज्यात अनेक ठिकाणी सॅनिटेशन व्हॅन, डोम किंवा टनेलचा वापर होत असून, त्याद्वारे व्यक्ती किंवा समूहावर वापर केला जात आहे. यासाठी वापरले जाणारी रसायने मानवी आरोग्यासाठी अपायकारक असून, अशा फवारणीमुळे कोरोना जंतुसंसर्ग रोखला जातो याला शास्त्रीय आधार नाही. त्यामुळे राज्यात अशा फवारणी यंत्रांचा वापर न करण्याच्या सूचना आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी दिल्या आहेत.
अखेर सॅनिटेशन व्हॅन, टनेल वापरण्यावर निर्बंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 10:09 AM