अकोला : अकोला महापालिका प्रभाग क्रमांक सातच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमागील नायगाव रेल्वे पुलापर्यंतच्या मार्गावरील एलईडी पथदिवे चोरीला गेले होते. पथदिवे चोरीला गेल्याने परिसरात काही दिवसांपासून अंधार पसरला होता. मनपा नगरसेवकांच्या तक्रारीमुळे अखेर या मार्गावर पथदिवे लावले गेले.नायगाव परिसरातील भवानी पेठ चौक, तार फैल मार्गावर एलईडी पथदिवे अचानक गहाळ झाले होते. उंच खांबावरून पथदिवे पळविणरी टोळी शहरात सक्रिय असल्याचा आरोप करीत येथे पथदिवे लावण्यात यावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली होती. दरम्यान, महापालिकेच्या पथकाने ही मागणी पूर्ण करीत पथदिवे लावलेत.२० कोटी रुपयांच्या खर्चातून शहरातील विविध भागात पथदिवे लावले गेले. यामध्ये मनपा प्रभाग सातमध्ये पथदिवे लावले गेले. अनेक परिसरात रोषणाईचे काम अजूनही सुरूच आहे. गुरुवार झालेल्या महापालिकेच्या आमसभेत सत्ताधारीसह विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी हा मुद्दा उचलला. मनपा वीज विभागाच्या अभियंत्याच्या दुर्लक्षित धोरणामुळे अनेकांनी दसरा, दिवाळी आणि ईद या अंधाराच्या मार्गाने जाऊन साजरी करावी लागली. हा भाग सभागृहात अधोरेखित झाल्याने मनपा प्रशासनाने तातडीने पथदिवे लावलेत. सिव्हिल लाइन चौक ते नेहरू पार्क चौक मार्गावर अंधार असल्याचेही समोर आले होते.