अकोला : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवार, रविवार या दोन दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर केले होते. त्यापैकी शनिवारचे लॉकडाऊन बंद केल्यानंतर आता रविवारचेही लॉकडाऊन संपण्याचे संकेत जिल्हा प्रशासनाकडून मिळाले आहेत. सध्या दर रविवारी करण्यात येणाºया लॉकडाऊनचा आदेश ३१ आॅगस्टपर्यंत कायम असल्याने सप्टेंबर महिन्याचा पहिला रविवार हा लॉकडाऊन मुक्त राहणार असल्याचे संकेत आहेत.जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ लागू करण्यात आला, तसेच साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ देखील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी लागू करण्यात आला. कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी फौजदारी प्रक्रिया १९७३ चे कलम १४४ (१), (२) व (३) अन्वये १ आॅगस्टपासून जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश जारी करण्यात आले होते ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत १ आॅगस्टपासून बाजारपेठेतील सम-विषम नियम रद्द करत सर्व दुकाने सोमवार ते शनिवारपर्यंत खुली ठेवण्यास मुभा देण्यात आली असून, दर रविवारी संपूर्ण लॉकडॉऊन पाळण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी केवळ दुकानांपुरतीच झाल्याचे दिसून आले. दर रविवारी शहरातील संचारबंदीमध्ये काही भागांत खुलेआम उल्लंघन होत असताना, पोलीस, महापालिका व जिल्हा प्रशासनाद्वारे कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. रस्त्यावरची वाहतूक व वर्दळसुद्धा कमी झाली नाही, त्यामुळे हे लॉकडाऊन केवळ औपचारिकता ठरले होते. अखेर ते रद्द होण्याचे संकेत जिल्हा प्रशासनातील सुत्रांनी दिले आहेत.
दक्षता घेणे आवश्यकच !अनलॉकची प्रक्रिया आता दिवसेंदिवस व्यापक होत असल्याने प्रत्येकाने आता दक्षता घेणे अधिक गरजेचे आहे. चेहºयावर मास्क लावावा. फिजिकल डिस्टन्सिंग व कोरोना प्रतिबंधात्मक उपायांबाबत शासनाचे आदेश व सूचनांचे पालन करणे अनिवार्य आहे. बाजारपेठा व दुकाने सुरू ठेवताना घ्यावयाची दक्षता व आवश्यक तपासण्या, स्वच्छता, निर्जंंतुकीकरण आदीचे पालन करणे अनिवार्य आहे. नागरिकांनी आपल्या सुरक्षेसाठी त्यांचे पालन करणे आवश्यक आहे.
सण-उत्सव काळात आल्या अडचणी‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. आता सण-उत्सवांच्या दिवसांत संचारबंदीच्या आदेशाबाबत नागरिकांमध्ये नाराजी होती. आॅगस्ट महिन्यातील पहिलाच रविवार लॉक असल्याने रक्षाबंधन सणावर परिणाम झाल्याच्या तक्रारी होत्या तर वंचित बहुजन आघाडीने चक्क राखी विक्रीचे दुकान थाटूनच या लॉकडाऊनचा विरोध प्रत्यक्षात नोंदविला होता. अनेक उद्योग, व्यवसायांना या काळात समस्या उद्भवत असल्याने हा लॉकडाऊन रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकाºयांकडे सातत्याने करण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर आता संचारबंदी उठविण्याचे संकेत आहेत.
विशेष मोहिमेची गरजबाजारपेठेत अनेक लोक विनामास्क फिरतात. गुटखा अन् खर्रा विक्रीवरचे बंधने उठविल्याने आता शौकिनांसाठी रान मोकळे झाले आहे. कुठेही थुंकण्याचे प्रमाण वाढले आहे. दुचाकी वाहनावरून जाताना दुचाकीस्वार तोंडातील गुटख्याची पिचकारी खुलेआम सोडतात. त्यामुळे आता कारवाया थंडावल्याने विशेष मोहिमेची गरज आहे.