अकोला : आपल्या विविध मागण्यांसाठी गत ११ एप्रिल पासून बेमुदत संप पुकारलेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अखेर त्यांचे आंदोलन सोमवारी स्थगित केले. शनिवार, २१ एप्रिल रोजी आरोग्य मंत्री दिपक सावंत यांच्या दालनात झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा अभ्यास करण्यासाठी त्रिस्तरीय समिती गठीत करण्यात आल्यानंतर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी, कर्मचारी महासंघ या संघटनेच्या राज्यस्तरीय नेतृत्वाने कामबंद आंदोलन १० दिवसांसाठी स्थगित करण्यात येत असल्याचे जाहीर केले.राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभागात विविध पदांवर कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. शासकीय सेवेत समायोजन व समान काम- समान वेतन या दोन प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी ११ एप्रिलपासून राज्यभरात बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले होते. या आंदोलनात मोठ्या संख्येने कंत्राटी कर्मचारी सहभागी झाल्याने आरोग्य व्यवस्था कोलमडली होती. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी शनिवार, २१ एप्रिल रोजी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे बैठक पार पडली. या बैठकीत संघटनेच्या प्रतिनिधींना बोलावण्यात आले होते. चर्चेनंतर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा अभ्यास आणि शिफारस करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली. या समितीमध्ये वित्त मंत्री, आरोग्य मंत्री व ग्रामविकास मंत्री यांचा समावेश असून, संघटनेच्या अध्यक्ष व सचिवांना निमंत्रित सदस्य म्हणून समाविष्ट करण्यात येणार आहे. सदर समितीला तीन महिन्यात अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्यामुळे संघटनेने कामबंद आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने सोमवारपासून जिल्ह्यातील एनएचएम कंत्राटी कर्मचारी त्यांच्या कामावर रूजू झाल्याची माहिती संघटनेचे जिल्हा सचिव गोपाल अंभोरे यांनी दिली....तर पुन्हा आंदोलनशासनाने गठीत केलेल्या त्रिसदस्यीय समितीची पहिली बैठक दहा दिवसांत घेऊन त्यामध्ये सकारात्मक निर्णय घेण्याच्या अटीवर संघटनेने कामबंद आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. येत्या दहा दिवसांत शासनाकडून कोणताही सकारात्मक निर्णय झाला नाही, तर आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराच संघटनेने दिला आहे.