लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावे हगणदरीमुक्तीची कामे न झाल्याने नऊ ग्रामसेवकांना निलंबित करण्याचे आदेश मागे घेण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती यांनी मान्य केल्याने कामावरील बहिष्कार आंदोलन तूर्तास स्थगित केल्याचे महाराष्ट्र ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष रवीबाबू काटे, सरचिटणीस महेंद्र बोचरे यांनी पत्रकात म्हटले आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत संपूर्ण तालुके हगणदरीमुक्त करण्यात मोठय़ा प्रमाणात अडचणी आहेत. वैयक्तिक शौचालयासाठी लाभार्थी उदासीन आहेत, त्यामुळे कंत्राटदारांकडून शौचालये बांधावी लागतात. लाभार्थी खड्डा खोदून देत नाहीत. त्याचे पैसे ग्रामसेवकांना द्यावे लागतात. एकट्या ग्रामसेवकाला ती कामे करावी लागतात. तरीही जिल्हय़ातील नऊ ग्रामसेवकांवर चुकीच्या माहितीच्या आधारे निलंबनाची कारवाई करण्यात आली. ग्रामसेवकांचे निलंबन मागे न घेतल्याने युनियनने २0 नोव्हेंबरपासून स्वच्छ भारत मिशनची सर्व कामे, मग्रारोहयो, वरिष्ठांना कुठलीही माहिती न देणे, अहवाल ऑनलाइन करण्याच्या कामावर बहिष्कार आंदोलन सुरू केले होते. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती यांनी कारवाई मागे घेत असल्याचे पत्र ग्रामसेवक युनियनला मंगळवारी प्राप्त झाले. त्यानुसार बहिष्कार आंदोलन मागे घेत असल्याचे जिल्हाध्यक्ष रवीबाबू काटे, सरचिटणीस महेंद्र बोचरे यांनी पत्रकात म्हटले आहे.
निलंबनाची कारवाई मागे घेतलेले ग्रामसेवकनिलंबित झालेल्यांमध्ये चार ग्रामविकास अधिकार्यांमध्ये वाडेगाव येथील एस.व्ही. डोंगरे, हातरूण येथील पी.एन. जामोदे, बेलखेड येथील ए.एन. उंबरकर, भटोरी येथील पंकज गुजर यांचा समावेश आहे. ग्रामसेवकांमध्ये टाकळी खोजबोळचे व्ही.आर. अंधारे, सौंदळाचे जी.एस. भुस्कुटे, आडसूळचे जी.एस. गवळी, तेल्हारा तालुक्यातील खंडाळाचे एस.बी. काकड, बाळापूर पंचायत समितीतील ए.एम. शिंदे यांचा समावेश आहे. त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्यात आली.