तेल्हारा : अनेक वर्षांपासून तहसील कार्यालयाच्या इमारतीचे काम पूर्ण झाले होते. काही तांत्रिक अडचणी पाहता जागा हस्तांतरणाचा विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करीत नसल्याने इमारतीत काम सुरू झाले नव्हते; मात्र नव्याने रुजू झालेले प्रभारी तहसीलदार राजेश गुरव यांनी पुढाकार घेऊन प्रश्न मार्गी लावल्यामुळे नवीन इमारतीचा तिढा सुटला.
अनेक वर्षांपासून तहसील कार्यालयाची इमारत करोडो रुपये खर्चून तयार होती; मात्र काही बाबी यामध्ये अपूर्ण असल्याने महसूल विभाग जागा हस्तांतरण करून घेण्यास तयार नव्हते. त्यामुळे जुन्या इमारतीतूनच तहसीलचे कामकाज सुरू होते. जागा अपुरी असल्याने नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत होता. अखेर नव्याने रुजू झालेले नायब तहसीलदार तथा प्रभारी तहसीलदार राजेश गुरव यांनी पुढाकार घेऊन जागा हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण केली असून, नव्या इमारतीमधून संपूर्ण तहसीलचे काम सुरू आहे. (फोटो)