आशिष गावंडे, अकाेला: चार जीन परिसरातून सोमवारी रात्री अपहरण झालेले व्यावसायीक अरुणकुमार वाेरा अखेर दोन दिवसांच्या कालावधीनंतर बुधवारी रात्री एक वाजताच्या सुमारास घरी सुखरूप पोहोचले. यामुळे त्यांच्या कुटुंबीयांसह पोलीस यंत्रणेने सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
रामदास पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दगडी पुलानजीकच्या चार जिन परिसरातील व्यावसायिक अरुण कुमार वोरा यांचे १३ मे रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास अपहरण करण्यात आले होते.त्यांचे अपहरण हाेऊन दाेन दिवसांचा कालावधी झाला होता. जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या निर्देशानुसार रामदास पेठ पाेलिसांनी अपहृत वाेरा यांची माहिती देणाऱ्यास २५ हजारांचे इनाम जाहीर केले होते. दरम्यान, या प्रकरणातील आराेपींचा शाेध घेऊन वाेरा यांना घरी सुरक्षित आणन्याच्या उद्देशातून भाजपाचे प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रणधीर सावरकर, अनुप धोत्रे, माजी महापाैर विजय अग्रवाल यांनी बुधवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्यासोबत आ.सावरकर यांनी भ्रमध्वनीवरून चर्चा करीत या प्रकरणाचा तपास जलदगतीने करण्याची मागणी केली होती. यावेळी आ.सावरकर यांनी अरुणकुमार वाेरा यांच्या कुटंबियांची भेट घेतली होती.
शिवसेनेने दिले निवेदन
अपहृत व्यावसायीक अरुणकुमार वाेरा यांचा तातडीने शाेध घेण्याची मागणी करीत बुधवारी शिवसेनेच्या (ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांनी शहर पाेलिस उपअधीक्षक सतीष कुलकर्णी तसेच रामदास पेठ पाेलिस स्टेशनचे पाेलिस निरीक्षक मनाेज बहुरे यांना निवेदन दिले. यावेळी माजी नगरसेवक शरद तुरकर, तरुण बगेरे, युवासेना शहर प्रमुख नितीन मिश्रा, संजय अग्रवाल, देवा गावंडेसह अनेक शिवसैनिक उपस्थित हाेते.
शहरातील प्रतिष्ठीत व्यावसायीकाचे अपहरण झाल्यामुळे इतर व्यावसायिकांमध्ये भीती व दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. यासंदर्भात आम्ही जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्यासाेबत पत्रव्यवहार करून उद्या त्यांची भेट घेणार होतो. अरुण कुमार घरी परत आल्याचा आनंद आहे. - निकेश गुप्ता अध्यक्ष, विदर्भ चेंबर ऑफ काॅमर्स अकाेला जिल्हा
व्यावसायीक वाेरा यांच्या अपहरण प्रकरणामुळे शहरात निर्भयपणे व्यापार,व्यवसाय करणाऱ्यांच्या मनात एक अनाहुत भीती निर्माण झाली होती. आम्ही सर्वजण वाेरा कुटुंबियांच्या पाठीशी आहाेत. प्रत्येक व्यावसायीकाने सीसीटीव्ही लावणे क्रमप्राप्त आहे. वोरा रात्री घरी परत आल्याचे समाधान आहे. - शैलेश खराेटे अध्यक्ष, सराफा असाेसिएशन अकाेला