------------
दिग्रस बु : पातूर तालुक्यातील दिग्रस बु-दिग्रस खुर्द या मुख्य रस्त्यावरील निर्माणाधीन असलेल्या पुलाजवळ जाड प्रमाणात मोठी खडी असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याच रस्त्यावर दुचाकी घसरल्याने दोघे इसम जखमी झाल्याची घटना घडली. याबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच पुलाजवळ कामास प्रारंभ करण्यात आला आहे.
दिग्रस बु. बसस्थानक-दिग्रस खुर्द बसस्थानकापर्यंत एकूण दोन अडीच किलोमीटरवर रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत तयार करणे सुरू आहे. या निर्माणाधीन रस्त्यावर जवळजवळ दोन ते तीन छोट्या पुलांची निर्मिती झाली आहे. परंतु या पुलाच्या दोन्ही बाजूने जाड खडी मागील कित्येक दिवसांपासून टाकलेली आहे. या खडीवर वाहन गेले की, त्यावरून वाहन घसरून खाली कोसळल्याच्या घटना घडत आहेत. दिग्रस खुर्द गावात लग्नाच्या कार्यक्रमानिमित्त गावात येणारे पाहुणे यांचे वाहन घसरून जखमी झाल्याची घटना घडली आहे. याकडे वरिष्ठ प्रशासन अधिकारी यांनी लक्ष देऊन या पुलावरून जाण्यासाठी रस्ता सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी दिग्रस खुर्दचे ग्रा. पं. सदस्य मंगेश इंगळे यांनी केली.