अकोला: शासनाच्या समाजकल्याण विभाग अंतर्गत येणाऱ्या आश्रमशाळांमध्ये लिपिक पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून राज्यभरातील ८३ बेरोजगार युवकांची तब्बल एक कोटींच्यावर रूपयांनी लुबाडणूक केल्याचे खदान पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. पोलिसांनी आतापर्यंत तीन आरोपींना अटक केली. तीनही आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींची कारागृहात रवानगी केली.खडकीत राहणारा प्रवीण सुरवाडे, बळीराम गवई, नीलेश खिल्लारे, संध्या सुरवाडे आदींनी जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील इतर ठिकाणच्या बेरोजगार युवकांना हेरून त्यांना शासनाच्या समाजकल्याण विभागाच्या आश्रमशाळांमध्ये नोकरी लावून देतो आणि नोकरीची आॅर्डरसुद्धा देतो, असे सांगून त्या बेरोजगार युवकांकडून लाखो रुपये जमा केले. या टोळीने अकोला जिल्ह्यातील २0 च्यावर युवकांची आर्थिक फसवणूक केली. खदान पोलिसांनी आरोपी प्रवीण सुरवाडे, नीलेश खिल्लारे आणि बनावट कागदपत्रे तयार करून देणारा रेहान खान यांना अटक केली. आरोपींची चौकशी केल्यावर या टोळीने राज्यभरातील ८३ युवकांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केल्याचे समोर आले. तिघाही आरोपींना शनिवारी दुपारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींची कारागृहात रवानगी केली आहे. यातील दोन आरोपी फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)