नागपूर : जिल्ह्यातील सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी प्रकल्प पूर्ण होणे गरजेचे आहे, मागील वर्षी हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ज्या अडचणी समोर आल्या होत्या, त्या दूर करण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न केले आहेत. अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या आराखड्यांना मान्यता देण्यात आली आहे. तसेच सुधारित प्रशासकीय मान्यता तातडीने देण्यात आल्याने हे प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विधान भवनातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या अकोला जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते.जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी जिल्ह्यातील कामांबाबत सादरीकरण केले. त्यानुसार मुख्यमंत्री यांनी मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवार योजना, धडक सिंचन विहीरी, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, पोलिसांसाठी घरे, कृषी पंपांसाठी वीजजोडणी, आवास योजना, स्वच्छ भारत अभियान, सिंचन प्रकल्प आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रश्नांचा आढावा घेतला.कवठा, काटीपाटी, घुंगशी बॅरेज या प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी आवश्यक असलेल्या मान्यता तातडीने देण्यात आल्या आहे. कवठा बॅरेजचे काम जूनपर्यंत पूर्ण करून पाणीसाठा निर्माण करण्यासाठी नियोजन करावे. यासाठी लागणारा ९० कोटींचा निधी देण्यात येईल. उमा बॅरेजला आलेल्या पाच अडचणी दूर करण्यात आल्या आहेत. या प्रकल्पांचे काम पूर्ण करून पाणीसाठा निर्माण होण्याच्या दृष्टीने काम करणे आवश्यक आहे. अकोला शहरासह मूर्तिजापूर, बाळापूर आदी शहरांना पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीकोनातून प्रकल्पांची कामे पूर्ण होणे आवश्यक आहे, त्यादृष्टीने प्रशासकीय यंत्रणांनी कार्य करावे, तसेच बार्शी टाकळी ग्रामीण पाणीपुरवठा योजनेसाठी पाणी आरक्षण तातडीने मंजूर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले.यावेळी अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील, खासदार संजय धोत्रे, आमदार सर्वश्री गोवर्धन शर्मा, गोपीकिशन बजोरिया, रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकळे, हरिष पिंपळे, बळीराम शिरस्कार, महापौर विजय अग्रवाल, मुख्य सचिव सुमित मल्लिक, मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, विभागीय आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर आदीसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
अकोल्यातील सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 1:14 PM