- संतोष गव्हाळे
हातरुण - वाहनात भरलेल्या २० क्विंटल कापसाला अचानक आग लागल्याने वाहनासह कापसाची राखरांगोळी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी हातरुण येथे घडली. या आगीमुळे अंदाजे २ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. हातरुण येथील शेतकरी सुभाषचंद्र अग्रवाल यांनी शेतातील कापूस बुधवारी रात्री टाटा एस एम एच ०४ - डी. एस. ३५३९ या वाहनात भरून ठेवला होता. या वाहनात २० क्विंटल कापूस होता. गुरुवारी सकाळी या कापूस भरलेल्या वाहनाला अचानक आग लागल्याने मोठ्या प्रमाणात धूर निघतांना दिसून आला. या गाडीवर असलेले टायर (स्टेपनी) आगीमुळे वर उडून टिनावर पडले.त्यामुळे आवाज झाल्याने बाजूने राहणारा अजय गिरी युवकाने गाडीकडे धाव घेतली असता गाडीने पेटलेली दिसून आली. अजय गिरी या युवकांसह चार ते पाच जणांनी मोठया प्रमाणात पाणी टाकून आग विझवली. मात्र या आगीत इंजिनसह गाडी व कापूस खाक झाला. या घटनेची माहिती मिळताच हातरुण चे तलाठी दत्तात्रय काळे यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. अनिल अग्रवाल यांच्या मालकीच्या जळलेल्या गाडीचे दीड लाखाचे व शेतकरी सुभाषचंद्र अग्रवाल यांच्या कापसाचे ४० हजार असे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात नमूद आहे. या घटनास्थळाची हातरुण पोलीस चौकीचे बिट जमादार विजय चव्हाण आणि सुरेश कुंभारे यांनी पाहणी करून तपास सुरू केला आहे. नुकसानग्रस्त शेतकरी सुभाषचंद्र अग्रवाल, अनिल अग्रवाल, माजी पंचायत समिती सदस्य मंजूर शाह, गजानन नसुर्डे उपस्थित होते.