अकोला: अग्निप्रतिबंधक उपाययोजना न करणाऱ्या शहरातील ५१ कोचिंग क्लासेस व १३ वसतिगृहांवर महापालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारल्यानंतर ४० कोचिंग क्लासेस व ६ वसतिगृहांनी अग्निप्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. तसा अनुपालन अहवाल संबंधितांनी अग्निशमन विभागाकडे सादर केला आहे. या उपाययोजनांची अंमलबजावणी तपासण्यासाठी अग्निशमन विभागाने १२ कोचिंग क्लासेसची पाहणी केली आहे.गुजरातमधील सुरत येथील दुर्दैवी घटनेनंतर महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांच्या आदेशानुसार अग्निशमन विभागाकडून शहरातील खासगी शिकवणी वर्ग, वसतिगृहांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत ५१ शिकवणी वर्ग आणि १३ वसतिगृहांमध्ये अग्निप्रतिबंधक उपाययोजना तसेच आपत्कालीन दरवाजा नसल्याचे समोर आले. त्यामुळे या खासगी शिकवणी वर्गासह वसतिगृह संचालकांना अग्निशमन विभागाने नोटीस बजावली होती. नोटीस प्राप्त झाल्यानंतरही अग्निप्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित न करणाºया सहा कोचिंग क्लासला ‘सील’ लावण्याची कारवाई अग्निशमन विभागाने केली होती. मनपाची भूमिका लक्षात घेता ५१ पैकी ४० कोचिंग क्लासेस व १३ वसतिगृहांपैकी सहा वसतिगृहांनी अग्निप्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. अग्निशमन विभागाकडून आकस्मिक भेट देऊन कोचिंग क्लासची पाहणी केली जात आहे.‘सील’ लावण्याची कारवाई का नाही?मनपाने नोटीस दिल्यानंतरही काही कोचिंग क्लासेसच्या संचालकांनी अग्निप्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजनांची पूर्तता करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. संबंधित कोचिंग क्लासला ‘सील’ लावण्याची कारवाई का नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.