अकोला: भांडुप येथील सनराइज रुग्णालयाला लागलेल्या आगीत होरपळून दहा जणांचा मृत्यू झाला. गत तीन महिन्यातील ही दुसरी घटना असून, अद्यापही जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची मदार कुचकामी अग्निशमन यंत्रणेवरच आहे. सर्वोपचार रुग्णालयासह जिल्ह्यातील सातही शासकीय कोविड केअर सेंटरमध्ये आवश्यक अग्निशमन यंत्रणा नसल्याचे दिसून येते. भांडुप येथील घटनेपूर्वी जानेवारी महिन्यात भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिट (एसएनसीयु)मध्ये आग लागल्याने दहा शिशुंचा होरपडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील आरोग्य यंत्रणांचे फायर ऑडिट करण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली होती. मात्र महिनाभरात प्रशासनाला याचा विसर पडल्याचे निदर्शनास येत आहे. सर्वोपचार रुग्णालयासह जिल्हा स्त्री रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालये तसेच कोविड केअर सेंटरमध्ये अग्निशमन यंत्रणा कुचकामी असल्याचे निदर्शनास येत आहे. सर्वोपचार रुग्णायत ‘फायर फायटींग ॲन्ड डीटेक्टर सिस्टीम’ अजूनही कार्यान्वित नाही. सध्यस्थितीत आरोग्य यंत्रणेवरील भार वाढला असून या ठिकाणी सुरक्षेची कुठलीच हमी नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
२०१६-१७ मध्ये झाले फायर ऑडिट!
जीएमसी प्रशासनाच्या मते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयाच्या इमारतीचे फायर ऑडिट २०१६-१७मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इलेक्ट्रीक विभागाने खासगी कंपनीमार्फत केले. मात्र, त्यानंतर अग्णिशमन यंत्रणा कार्यान्वित करण्याची प्रक्रिया झाली नाही.
२२ मार्चला पाठविला सुधारीत प्रस्ताव
सर्वोपचार रुग्णालयाचे फायर ऑडिट होऊन उपाययोजनांसाठी २ कोटी ४२ लाखांचा प्रस्ताव १५ फेब्रुवारी रोजी संचालक वैद्यकीय शिक्षण व संशोधक मुंबई यांना पाठविला होता. त्यामध्ये काही त्रुटी आल्या होत्या. त्या त्रुटींची पुर्तता करुन २२ मार्च रोजी सुधारीत प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोविड केअर सेंटर असुरक्षितच
जिल्ह्यात सात कोविड केअर सेंटर सुरू असून, या ठिकाणी अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नसल्याचे दिसून येते. यामध्ये प्रामुख्याने बाळापूर तालुक्यातील शेळद, मूर्तिजापूर तालुक्यातील हेंडज, अकोट तालुक्यातील पास्टूल, पातुर तालुक्यातील आयुर्वेदिक महाविद्यालय, बार्शिटाकळी, अकोल्यातील समाज कल्याण विभागाचे गुणवंत बॉईज हॉस्टेल आणि तेल्हारा येथील गोपालराव केळकर कोविड केअर सेंटरचा समावेश आहे.