लोकमत न्यूज नेटवर्ककानशिवणी: येथील राधाकृष्ण जिनिंग फॅक्टरीच्या गोदामातील कापसाच्या गठाणींना १६ मेच्या रात्री ८.३० वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत जिनिंग फॅक्टरीचे साडेसहा कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.राधाकृष्ण जिनिंग फॅक्टरीच्या सदर गोदामालगत असलेल्या शेताच्या धुऱ्याला मंगळवारी रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास आग लागली होती. त्या आगीच्या ठिणग्या हवेमुळे बंद गोदामातील कापसाच्या गठाणीवर पडून गोदामातील गठाणींच्या कापसाने पेट घेतला. या बाबीची माहिती तेथील कर्मचाऱ्यांनी त्वरित बोरगाव मंजू पोलीस स्टेशनला दिली. बोरगावमंजू पोलिसांनी याबाबत अकोला व मूर्तिजापूर येथील अग्निशामक दलाला तातडीने दिली. त्यानंतर अकोला येथून अग्निशामक दलाची एक गाडी तातडीने आली व आग विझविण्यास सुरुवात केली. सव्वा तासाने मूर्तिजापूर येथील अग्निशामक दलाची गाडी आली. त्यांच्यातील पाणी संपल्यावर त्या परिसरातील वीज पुरवठा बंद असल्याने वीज कंपनीच्या अभियंत्यांना कळविल्यावर वीजपुरवठा सुरू झाला. त्यामुळे आग विझविण्याचे काम पुन्हा सुरू झाले. तथापि, ही आग हे वृत्त लिहीपर्यंत सुरूच होती. या आगीत जिनिंग फॅक्टरीच्या गोदामातील कापसाच्या तीन हजार गठाणी जळून भस्मसात झाल्याने सुमारे साडेसहा कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या आगीचे वृत्त कळताच फॅक्टरीमालक विलासराव शेळके, राहुल शेळके, साहेबराव शेळके व शेळके परिवारातील अन्य सदस्य, बोरगाव मंजूचे ठाणेदार पी.के. काटकर, हे.कॉ. धांडे, एनसीपी गवळी आदी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी व उपस्थित गावकऱ्यांचे आग विझविण्याचे प्रयत्न हे वृत्त लिहीपर्यंत सुरूच होते.
जिनिंग फॅक्टरीला आग; साडेसहा कोटींचे नुकसान!
By admin | Published: May 17, 2017 2:29 AM