अकोला : अग्निशमन यंत्रणा असली तरी त्याचा वापर कर्मचाऱ्यांना करता यावा, या उद्देशाने रविवारी (दि.१०) जिल्हा स्री रुग्णालयात फायर मॉक ड्रिल करण्यात आले. यावेळी जवळपास ७०पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना मनपा अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून प्रशिक्षण देण्यात आले. भंडारा येथील घटनेनंतर हे प्रशिक्षण घेण्यात आले हे विशेष. जिल्हा स्री रुग्णालयाचे इलेक्ट्रिकल फायर ऑडिट झाले असले तरी फायर फायटिंग ॲण्ड डिटक्शन सिस्टीम कार्यान्वित नाही. त्यामुळे रुग्णालयाच्या सुरक्षेची मदार अग्निशमन सिलिंडरवर आहे. अशा परिस्थितीत रुग्णालयात आग लागल्यास उपलब्ध साधनांचा वापर करून परिस्थितीवर नियंत्रण कसे मिळवायचे या अनुषंगाने रविवारी जिल्हा स्री रुग्णालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांना फायर मॉक ड्रिलच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी ७०पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. कर्मचाऱ्यांना मार्गदर्शनासाठी मनपा अग्निशमन विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. मॉक ड्रिलदरम्यान अग्निशमन विभागाची गाडी बोलावण्यात आली होती.
असे झाले मॉक ड्रिल
- रुग्णालयातील अग्निशामक सीओ-२, एबीसी आणि ड्राय पावडर सिलिंडरविषयी अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्राथमिक माहिती देण्यात आली.
- त्याचा वापर कसा करावा या संदर्भात प्रत्यक्ष प्रात्याक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.
- त्यानंतर रुग्णालयातील मुख्य स्वीच कुठे आहे आणि आग लागल्यास त्यातील कोणते स्वीच बंद करावे याचे प्रात्याक्षिक देण्यात आले.
- नव्या इमारतीमधील सिक्युरिटी अलार्म कसा कार्य करतो, याविषयीदेखील मार्गदर्शन करण्यात आले.
- दर सहा महिन्यात एकदा फायर मॉक ड्रिल
जिल्हा स्री रुग्णालयात दर सहा महिन्यातून एकदा फायर मॉक ड्रिल करण्यात येते. भंडारा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर रविवारी जिल्हा स्री रुग्णालयात फायर मॉक ड्रिल घेण्यात आले. दरवर्षी रुग्णालय स्तरावरच या प्रकारचे फायर मॉक ड्रिल केले जाते, मात्र यंदा पहिल्यांदाच मॉक ड्रिलसाठी रुग्णालयातील सर्वच डॉक्टर, अधिकारी व कर्मचारी असे एकूण ७० जणांना एकाच वेळी प्रशिक्षण देण्यात आले.
भंडारा येथील घटना भयावह आहे. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये तसेच आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना अग्निशमन यंत्रणेचा उपयोग करता यावा, या उद्देशाने रविवारी खबरदारी म्हणून फायर मॉक ड्रिल घेण्यात आली. दर सहा महिन्यातून एकदा रुग्णालयस्तरावर फायर मॉक ड्रिल केली जाते.
- डॉ. आरती कुलवाल, वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा स्री रुग्णालय