अग्निशमन विभाग कार्यालय 1 एएम
अकाेला : महापालिकेच्या प्रशासकीय कारभारावर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असले तरी आगीची घटना घडल्यावर ती विझवण्यासाठी मनपाचा अग्निशमन विभाग कमालीचा सक्रिय असल्याचे दिसून येते. या कार्यालयातील कर्मचारी जीव धाेक्यात घालून कामकाज करतात. रात्री बारानंतरही हा विभाग अलर्ट असल्याचे चित्र पाहणीदरम्यान समाेर आले आहे.
शहरातच नव्हे तर जिल्ह्याच्या काेणत्याही भागात आग लागल्यास महापालिकेचा अग्निशमन विभाग मदतीसाठी धावून जाताे. उन्हाळ्यात आगीच्या घटनांमध्ये वाढ हाेते. या वेळी जीवाची पर्वा न करता अग्निशमन विभागातील कर्मचारी कर्तव्य बजावताना दिसून येतात. मनपाच्या प्रभारी आयुक्त निमा अराेरा यांनी मध्यंतरी थेट या कार्यालयात जाऊन आढावा घेतला हाेता. तेव्हापासून हा विभाग कायम सक्रिय असल्याचे पाहावयास मिळते. मनपाचा पाचपट भाैगाेलिक विस्तार झाल्यामुळे या विभागाला बंब, अत्याधुनिक साहित्याची गरज भासू लागली आहे. दरम्यान, रात्री १२ नंतर या विभागाची आकस्मिक पाहणी केली असता, कर्मचारी गप्पा करीत बसले हाेते.
तयार स्थितीत बंब तीन
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या कार्यालयात एकूण सहा बंब कार्यान्वित आहेत. यापैकी रात्री तीन बंब तयार स्थितीत असल्याचे आढळून आले. या व्यतिरिक्त एक लहान वाहन सज्ज हाेते.
७ कर्मचारी गप्पांत दंग
अग्निशमन विभागाला मनुष्यबळाची गरज आहे. आज राेजी या विभागात एकूण ६० कर्मचारी सेवारत असून यामध्ये आस्थापना, मानसेवी व कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. रात्रपाळीनुसार १७ पैकी ७ कर्मचारी गप्पांत दंग हाेते. तीन जण टेलीफाेन रूममध्ये हाेते, तर काही कर्मचारी कार्यालयात निवांत पहुडले हाेते.
चालक म्हणाले दुपारी झाेप घेतली!
अग्निशमन विभागातील वाहनांची उपलब्ध संख्या पाहता चालकांची संख्या पुरेशी असल्याचे दिसून आले. या ठिकाणी पाच वाहनचालक उपलब्ध असल्याचे आढळून आले. घरी दुपारी निवांत झाेप घेत असल्याने रात्री जागरण करताना अडचण नसल्याचे काही चालकांनी सांगितले.
नियम काय सांगताे?
उपलब्ध कर्मचाऱ्यांचे संख्याबळ अतितातडीची सेवा पाहता तीनही पाळीत किमान दाेन संत्रींचा राबता पहारा असणे अपेक्षित आहे. त्यासाेबतच टेलीफाेन ऑपरेटरने त्याच्या कार्यालयात चाेख कर्तव्य बजावणे क्रमप्राप्त आहे.
महापालिका हद्दीतच नव्हे तर जिल्ह्याच्या विविध भागांत आगीची घटना घडल्यास व संबंधित प्रशासनाने संपर्क साधल्यास अग्निशमन विभागाचे कर्मचारी बंब घेऊन दाखल हाेतात. जीव धाेक्यात घालून कर्मचारी कामकाज करतात. सुरक्षेसाठी अत्याधुनिक साहित्याची गरज आहे.
- मनिष कथले, अग्निशमन विभागप्रमुख, मनपा