शेगाव: येथील नगर परिषद आवारातील दुकान गाळय़ांमध्ये असलेल्या नीलेश स्टील सेंटरला आग लागल्याची घटना १0 एप्रिल रोजी रात्री १0.३0 वाजताच्या सुमारास घडली. ही आग पसरल्याने शेजारील दोन दुकानांचे साहित्यसुद्धा जळून नुकसान झाले. दरम्यान रात्री उशिरापर्यंत या आगीचे कारण कळू शकले नाही.नगर परिषद आवारात असलेल्या व्यापारी संकुलातील नीलेश स्टील सेंटर या नीलेश टेकाडे यांच्या भांडी विक्रीच्या दुकानाला ६ एप्रिल रोजी रात्री १0.३0 वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत सुमारे १0 लाखांचे नुकसान झाले. ही आग शेजारी असलेल्या मॅचिंग सेंटर व पूजा जनरल स्टोअर्समध्येसुद्धा पसरली. त्यामुळे या दोन्ही दुकानांतील साहित्य जळाल्याने हानी झाली. नगर परिषदेचे अग्निशमन दल घटनास्थळानजीकच असतानासुद्धा सुमारे २0 मिनिटांनी घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन बंब आल्यानंतरही पाणी कमी असल्याने दोन मिनिटेच पाण्याचा मारा करुन पुन्हा पाणी भरण्यासाठी ते वाहन निघून गेले. अग्निशमन दल तत्परतेने घटनास्थळी पोहोचले असते, तर नीलेश स्टील सेंटरमधील साहित्याच्या नुकसानाचे प्रमाण कमी झाले असते. आग पसरण्यापासूनसुद्धा वाचली असती, असा आरोप यावेळी उपस्थितांनी केला
शेगावात तीन दुकानांना आग
By admin | Published: April 07, 2016 1:45 AM