अकोला: उरळ पाेलिसांच्या वाहनावर गाेळीबार करण्याच्या घटनेला १४ दिवसांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही गुन्हेगारांचा शाेध लावण्यात पाेलिस यंत्रणा कुचकामी ठरली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत शनिवारी जिल्हा पाेलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान, हल्लेखाेरांची माहिती देणाऱ्यास २५ हजार रुपयांचे बक्षिस देण्याचे पाेलीस प्रशासनाने जाहीर केले आहे.
उरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत ३१ डिसेंबर २०२३ च्या रात्री मांजरी फाटा ते कंचनपुर रोडवर गस्तीवर असणाऱ्या पाेलिसांना मोटरसायकलवर काही इसम संशयास्पद फिरत असल्याचा संशय आला हाेता. पाेलिसांनी संशयीत इसमांचा पाठलाग केला असता, वाहनावरील हल्लेखाेरांनी पोलीसांच्या चारचाकी वाहनावर शस्त्र काढून फायर केला. तसेच अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरुन धुम ठाेकली हाेती. या घटनेला १४ दिवसांचा कालावधी हाेत आला तरी अद्यापपर्यंतही अज्ञात आरोपींचा शाेध लावण्यात पाेलिसांना यश मिळाले नाही.
‘एसपी’बच्चन सिंहांनी केली पाहणी
चक्क पाेलिसांच्या वाहनावर गाेळीबार करुन फरार झालेल्या हल्लेखाेरांचा सुगावा लागत नसल्याची बाब जिल्हा पाेलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी गांभीर्याने घेतली आहे. शनिवारी पाेलीस अधिक्षकांसह अप्पर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे, बाळापूर एसडीपीओ गोकुळ राज, ‘एसीबी’ प्रमुख शंकर शेळके, उरळचे ठाणेदार गाेपाल ढाेले, ‘एलसीबी’चे पो.उप.नि. गोपाल जाधव यांनी गाेळीबार झालेल्या घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी पाेलीस अधीक्षक सिंह यांनी तपासाच्या दृष्टीने दिशानिर्देश दिले.
माहिती देणाऱ्याचे नाव गाेपनिय
दरम्यान, पाेलिसांच्या वाहनावर फायरिंग करणाऱ्या हल्लेखाेरांची माहिती देणाऱ्यास २५ हजार रुपयांचे बक्षिण दिले जाइल. ‘एलसीबी’प्रमुख शंकर शेळके, उरळचे ठाणेदार गाेपाल ढाेले यांना प्रत्यक्ष भेटून अथवा माेबाइल वरुन माहिती दिल्यास संबंधित व्यक्तीचे नाव व माेबाइल क्रमांक गाेपनिय ठेवल्या जाणार आहे.