अकोला: आनंदी गुरुकुल ॲक्टिंंग अकॅडमी, अकोलाच्या वतीने नि:शुल्क पहिल्या आनंदी आभासी बालकुमार नाट्यसंमेलनाचे ३१ मे रोजी चित्रपट व नाट्य क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत भरगच्च कार्यक्रमांनी आयोजन करण्यात आले आहे.
लाॅकडाऊन काळामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये सकारात्मकता निर्माण व्हावी, मनोरंजनासोबतच त्यांच्या ज्ञानातही मोलाची भर पडावी, भीती, नैराश्य दूर व्हावे तसेच प्रत्येकामधील कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, या उदात्त हेतूने मागील वर्षभराहून अधिक काळापासून प्रा. दीपाली आतिश सोसे यांनी स्थापन केलेल्या आनंदी गुरुकुल ॲक्टिंग अकॅडमी या संस्थेच्या माध्यमातून हाेणाऱ्या या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी ‘नाळ’ चित्रपट फेम प्रख्यात बालकलाकार श्रीनिवास पोकळे यांची निवड करण्यात आली असून या संमेलनाचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या शुभहस्ते होणार आहे. या संमेलनाला स्वागताध्यक्ष म्हणून प्रा. दीपाली आतिश सोसे ह्या तर प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध दिग्दर्शिका, अभिनेत्री कांचन अधिकारी, प्रख्यात अभिनेते जयवंत वाडकर, भारतीय सेंसाॅर बोर्डाच्या माजी अध्यक्षा अपर्णा मोहिले तसेच विशेष उपस्थिती म्हणून ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेतील बालकलाकार आणि आनंदी गुरुकुलचे विद्यार्थी रेहान नदाफ हे उपस्थित राहणार आहेत.
सकाळी १० वाजतापासून सुरू होणाऱ्या या संमेलनामध्ये महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध नाट्यलेखक प्रशांत दळवी यांची ‘मराठी बालनाट्य’ या विषयावर प्रकट मुलाखत होणार असून ‘मराठी बालचित्रपट’ या विषयावर अभिनेते, लेखक, निर्माते दिनेश काळे तर ‘रंगभूमीवरील नाटकाची पूर्वतयारी’ या विषयावर ज्येष्ठ नाटककार लक्ष्मण द्रविड आपले विचार व्यक्त करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ज्युनिअर चार्ली अभिनेते सोमनाथ स्वभावाणे यांच्या अध्यक्षतेखाली समाराेप हाेणार आहे.