संतोष गव्हाळे/ हातरूण (जिल्हा अकोला)ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची जोड मिळावी, ते स्पर्धेत मागे राहू नये, यासाठी अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील हातरूण येथील स्व. नर्मदाबाई बनारसीलाल अग्रवाल प्राथमिक आश्रमशाळेने पुढाकार घेतला असून, शाळेत डिजिटल क्लासरूमच्या संकल्पनेसोबतच मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या सुविधेचा लोकार्पण सोहळा शनिवारी आयोजित केला असून, वायफाय सुविधा देणारी ही महाराष्ट्रातील पहिलीच आश्रमशाळा ठरणार आहे. शासनाकडून डिजिटल शाळांसाठी जनजागृती करण्यात येत आहे. शाळा डिजिटल होण्यासाठी काही ठिकाणी शिक्षक, समाजातील विविध घटक, ग्रामस्थही पुढाकार घेत आहेत. सामाजिक दायित्व म्हणून लोकवर्गणीही करण्यात येते. हीच जाणीव ठेवून आता निवासी आश्रमशाळेत वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इंटरनेटच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी अग्रेसर राहावा, हा हेतू डोळ्यासमोर ठेवून डिजिटल क्लासरूमच्या संकल्पनेसोबतच वायफाय सुविधा मोफत उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालकमंत्री, जिल्हाधिकार्यांची उपस्थिती महाराष्ट्रात पहिलीच डिजिटल क्लासरूम व मोफत वायफाय सुविधेचा उद्घाटन सोहळा शनिवारी सकाळी १0 वाजता होणार आहे. उद्घाटन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याला जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, आमदार बळीराम सिरस्कार, प्रादेशिक उपायुक्त दीपक वडकुते (अमरावती), सहायक आयुक्त शरद चव्हाण (अकोला), गोविंद गुंजाळ, सुभाषचंद्र अग्रवाल, भगवानदास अग्रवाल, मुकेश गव्हाणकर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. उपेक्षित घटकातील विद्यार्थ्यांना होणार फायदासामाजिक न्याय विभागांतर्गत भटक्या जाती, विमुक्त जमातीसाठी कार्यरत असलेल्या हातरुण येथील निवासी आश्रमशाळेत इयत्ता १ ते ७ मध्ये २१२ विद्यार्थी शिकत आहेत. शाळेत अकोला जिल्हय़ातील अडसूळ, तेल्हारा, मनात्री, चित्तलवाडी, दगडपारवा, दाळंबी, कोळंबी, निंबा, वाडेगाव, खांबोरा या परिसरातील विद्यार्थी शिकत आहेत.
मोफत वायफाय सुविधा देणारी राज्यातील पहिली आश्रमशाळा अकोल्यात
By admin | Published: April 09, 2016 1:38 AM