लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : देशातील पहिला देशी बीटी कापूस बहरला आहे. हे पांढरे सोने वेचणीला आले; पण मजूरच उपलब्ध नसल्याने या कापसाचे नुकसान होत असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दखल घेत कापूस प्रकल्पाला भेट दिली. यानंतर गुरुवारपासून कापसाच्या पहिल्या वेचणीला प्रारंभ झाला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व एका खासगी कंपनीने मिळून हे संशोधन पूर्ण केले आहे. कृषी विद्यापीठांनी निर्मित केलेल्या पीडीकेव्ही-जेकेएल ११६ कपाशीच्या वाणांमध्ये बीजी-२ चे जीन्स टाकून नवे वाण विकसित करण्यात आले आहे. कपाशीच्या या झाडांना कापूस बहरला आहे.
एक एकर क्षेत्रावर कापसाची चाचणी!डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे अकोल्यात मध्यवर्ती संशोधन केंद्र आहे. या केंद्राच्या पश्चिम विभागाच्या क्षेत्रावर १ एकर क्षेत्रावर बीटी कपाशीची चाचणी घेतली जात आहे. यामध्ये कोरडवाहू आणि ओलीत अशा दोनप्रकारच्या बीटी कपाशीची पेरणी करण्यात आली आहे. आता हा कापूस वेचणीला आला आहे. पहिल्या वेचणीत ३.५ क्विंटल कापूस वेचण्यात आला.
बीटी कापसाचे पीक जोरात असून, वेचणीला आले आहे. मजूर संपावर आहेत; पण हा बीटी कापूस चाचणीसाठीचा असल्याने वेचणी सुरू करण्यात आली आहे.- डॉ. दिलीप एम. मानकर,संचालक, संशोधन, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.