लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पुण्यातील रहिवासी एका युवकाचे पहिले लग्न झालेले असताना त्याने पहिला विवाह लपवून अकोल्यातील दुसर्या युवतीशी विवाह केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी समोर आला. या प्रकरणी दुसर्या पत्नीने डाबकी रोड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीसह सासरच्या मंडळीविरुद्ध फसवणूक, मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी शनिवारी गुन्हा दाखल केला आहे. वानखडे नगर येथील रहिवासी प्रीती सुरेश पवार (३0) या युवतीचा विवाह समाजाच्या परिचय पुस्तिकेतील पुणे जिल्हय़ातील भिवरी येथील रहिवासी प्रतीक गायकवाड याच्याशी २२ फेब्रुवारी २0१६ रोजी झाला होता. या विवाहानंतर प्रीती गायकवाड हिला पती प्रतीक गायकवाड, सासू प्रमिला गायकवाड, सासरे विलास गायकवाड, नणंद दिव्या गायकवाड, मावस सासू संगीता गायकवाड सर्व राहणार पुणे व अकोल्यात राहणारी मावस सासू वंदना खामकर यांनी त्रास देण्यास सुरुवात केली. तुम्ही लग्न ऐपतीप्रमाणे लावले नाही, लग्नात काहीच व्यवस्था केली नाही, असे सांगून प्रीतीचा छळ सुरू केला. घरातील वागणूक व सासरच्यांचे सर्व कामे करीत असतानाही विनाकारण छळ करण्यात येत असल्याचे प्रीतीच्या लक्षात आले. तिने पती प्रतीक गायकवाड यांची माहिती घेण्याचे काम सुरू केले असता, त्याचे दुसरे लग्न झाले असल्याची माहिती प्रीतीला मिळाली. तिने यासंदर्भात सासरच्या मंडळींना विचारणा केली असता त्यांनी हा विवाह लपविल्याचे समोर आले, आणि पतीच्या या पहिल्या विवाहाची वाच्यता न करण्यासाठी तिचा छळ सुरू केला. मात्र, पहिल्या विवाहाचे बिंग स्वत: प्रीतीने फोडताच तिने थेट अकोला येथील आई-वडिलांचे घर गाठले. यासंदर्भात त्यांनी डाबकी रोड पोलीस ठाण्यात घडलेल्या प्रकाराची तक्रार केली. यावरून पोलिसांनी चौकशी करून पहिला विवाह केलेला असतानाही तो लपवून दुसरा विवाह करणार्या पतीसह त्याला सहकार्य करणार्या सासरच्या मंडळीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे प्रकार अकोल्यात वाढले पुण्यातील कार्पोरेट कंपन्यांमध्ये नोकरीवर असलेल्या व गत तीन ते चार वर्षात नव्यानेच विवाह झालेल्या अनेक मुलांचे असे प्रताप समोर येत आहेत. पुण्यात मुलगी दिल्यानंतर मुलांचे आधीच विवाह झालेले असणे, घरच्यांच्या समाधानासाठी समाजातील मुलीशी विवाह करून तिचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे ८ ते १0 गुन्हे केवळ अकोला शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झाले असल्याची माहिती पोलीस अधिकार्यांनी दिली.