राजरत्न सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यातील पहिले सौर विजेवर चालणारे शीतगृह (गोदाम) अकोल्यात निर्माण केले जात आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचा (महाबीज) हा उपक्रम असून, भाजीपाला व इतर मूळ बियाण्यांचे (मदर सीड) या शीतगृहात जतन केले जाणार आहे. दरम्यान, नागपूरनंतर राज्यातील दुसरी केळी टिश्यू कल्चर प्रयोगशाळा जळगाव खान्देशला होणार आहे. त्यासाठी केंद्र शासनाने २ कोटी ९१ लाख रुपये मंजूर केले आहेत.महाबीजने राज्यात गोदामांची शंृखला तयार केली असून, शेतकर्यांना बियाण्यांची कमतरता भासू नये, यासाठीचे हे नियोजन करण्यात आले आहे. हायब्रीड भाजीपाला बियाणे उत्पादनावर भर देण्यात येत आहे. यासाठी लागणारे बियाणे शीतगृहात ठेवावी लागतात. याच पृष्ठभूमीवर महाबीजने शीतगृह उभारणीचा निर्णय घेतला होता. त्यासाठी सौर विजेवर हे शीतगृह निर्माण करण्यात येणार आहे. महाबीजच्या मुख्यालयांतर्गत शिवणी येथे शीतगृह उभारणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. राज्यातील बहुदा हे एकमेव सोलरवर चालणारे शीतगृह आहे.आता पुन्हा टिश्यू कल्चर संशोधनावर भर दिला जाणार असून, राज्यात नागपूर येथे टिश्यू कल्चर प्रयोगशाळा आहे; परंतु केळीचे उत्पादन हे जळगाव जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणात घेतले जात असल्याने जळगाव खान्देशला टिश्यू कल्चर प्रयोग शाळा असावी, यासाठीचा प्रस्ताव व प्रकल्प तयार करण्यात आला होता. त्या प्रकल्पाला केंद्र शासनाने २ कोटी ९१ लाखांचा निधी मंजूर केला आहे. तसेच नागपूर येथील टिश्यू कल्चर प्रयोग शाळाही सुरू च राहणार आहे. राज्यात महाबीजची २३ जिल्हय़ात कार्यालये आहेत. उर्वरित जिल्हय़ातही जागा मागणीचा प्रस्ताव महाबीजने तयार केला असून, शासनामार्फत जिल्हाधिकार्यांकडे हा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. तेथे प्रक्रिया केंद्र व गोदाम उभारण्यात येणार आहेत.
हायब्रीड भाजीपाला संशोधनावर भर देण्यात आला आहे. या बियाण्यांची थंड ठिकाणी साठवण करावी लागते. तसेच मूळ संशोधित बियाणेदेखील थंड ठिकाणी ठेवावे लागते. यासाठीच शीतगृह उभारण्यात येत आहे. पण, त्यासाठी औष्णिक विजेचा वापर न करता सोलर विजेचा उपयोग करण्यात येणार आहे. या शीतगृहाचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. टिश्यू कल्चर लॅब जळगावला होणार आहे.- ओमप्रकाश देशमुख, व्यवस्थापकीय संचालक, महाबीज, अकोला.-