नितीन गव्हाळे, अकोला: न्यू तापडियानगर ज्येष्ठ नागरिक रामचंद्र दुर्गय्या पिल्ले(८८) यांचे २६ एप्रिल रोजी सकाळी निधन झाले. त्यांची अंत्यसंस्काराची तयारी सुरू असल्याने, मुलगा दिनेश पिल्ले यांनी दु:ख बाजुले सारले. आधी मतदान, मग वडिलांवर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेत, पिल्ले यांनी मतदान केंद्रांवर कुटूंबियांसह जाऊन मतदान करीत राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले.
घरात दु:खाचे वातावरण असताना, काही तास वडिलांचे अंत्यसंस्कार बाजुला ठेऊन मुलगा दिनेश पिल्ले यांनी कुटूंबासह मतदानाचा हक्क बजावला. घरात वडिलांचे पार्थिव असताना, मुलाने आधी मतदानाचे कर्तव्य बजावले. त्यानंतर त्यांनी वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.बहिष्कार मागे घेत, ७० कुटूंबियांनी केले मतदान
अकोला पूर्व मतदारसंघात येणाऱ्या बिर्ला राममंदिरासमोर राहणाऱ्या बिर्लातील कामगारांच्या ७० कुटुंबांना जिल्हा प्रशासनाने घरे खाली करण्याची नोटीस दिल्यावरून त्यांनी उपोषण पुकारले होते. मात्र त्यावर तोडगा न निघाल्याने, ७० कामगार कुटुंबीयांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. अखेर जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचा निरोप घेऊन तहसीलदार सुरेश कव्हळे हे या कुटुंबीयांची समजूत काढण्यासाठी बिर्ला कॉलनी येथे पोहचले. त्यांनी कुटूंबियांची समजूत काढून, त्यांना तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने, त्यांनीही मतदानावरील बहिष्कार मागे घेत, मतदान केले.