लॉकडाऊनच्या काळात अनेकांचा रोजगार गेला आहे. अशा परिस्थितीत दुर्धर आजारासह जीवन जगणाऱ्या कुटुंब प्रमुखाच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. अशा कुटुंबांना जगण्याचा आधार मिळावा म्हणून त्यांचा समावेश अंत्योदय याेजनेत केला आहे. मात्र, ज्या कुटुंबात १ किंवा २ सदस्य एचआयव्हीसह जीवन जगत आहेत, अशा अनेक कुटुंबांना विविध कारणे देऊन योजनेपासून वंचित ठेवण्यात येत आहे. त्यामुळे अशा कुटुंबातील कर्त्या पुरुषाच्या मृत्यूनंतर कुटुंबातील विधवा, त्यांच्या अपत्यांसमोर जगण्याचा मोठा प्रश्न पडतो. अशा १०२ कुटुंबांना ही योजना लागू करणारा अकोला जिल्हा हा राज्यातील पहिलाच जिल्हा ठरला आहे. त्यामुळे पहिल्यांदाच अंत्योदय योजनेचा लाभ मिळाला असून, ही राज्यातील पहिलीच वेळ आहे.
‘विहान’ने दिला होता लढा
एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्यांसाठी कार्यरत असलेली नेटवर्क ऑफ अकोला बाय पीपल लिव्हिंग विथ एच.आय.व्ही. (विहान) ही संस्था नेहमीच एचआयव्ही बाधितांसाठी लढा देत असते. लॉकडाऊन काळातही या संस्थेने एचआयव्ही बाधितांपर्यंत औषध व किराणा पोहोचविण्याचे कार्य केले हाेते. या यशस्वी कामगिरीनंतर त्यांनी अंत्योदय योजनेपासून वंचित राहिलेल्या कुटुंबासाठी लढा देण्यास सुरुवात केली. त्यामध्ये त्यांना यश मिळाले. यासाठी विहानचे शुभांगी खराटे, गौतम ढाले व गोपाल चव्हाण यांनी प्रयत्न केले. तसेच जिल्हा एड्स नियंत्रण कार्यक्रमाचे दर्शन जनईकर, जिल्हा पुरवठा अधिकारी काळे यांनी सहकार्य केले.
आणखी ८८ कुटुंबांचे प्रस्ताव लागणार मार्गी
एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या आणखी ८८ कुटुंबीयांचे प्रस्ताव जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत. या कुटुंबांना देखील लवकरच या योजनेचा लाभ मिळवून देणार असल्याचे नेटवर्क ऑफ अकोला बाय पीपल लिव्हिंग विथ एच.आय.व्ही. (विहान) संस्थेतर्फे सांगण्यात आले.
एचआयव्हीसह जीवन जगणारे एकही कुटुंब अंत्योदय योजनेपासून वंचित राहू नये असा प्रयत्न आहे. त्या अनुषंगाने विहान संस्थेच्या मदतीने हा टप्पा यशस्वी पार पाडला.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला