अकोला : पातूर तालुक्यातील पांढुर्णा या गावात स्वातंत्र्यानंतर प्रथमच राज्य परिवहन महामंडळाची बस फेरी सुरू करण्यात आली. या फेरीच्या शुभारंभप्रसंगी शनिवारी राज्याचे गृहराज्यमंत्री ना. डॉ. रणजित पाटील व आमदार बळीराम सिरस्कार यांच्यासह अनेक मान्यवरांनी पिंपळडोळी ते पांढुर्णा असा बस प्रवास करून ग्रामस्थांचा आनंद द्विगुणित केला.मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत पिंपळडोळी ते पांढुर्णा या ठिकाणी नवीन रस्त्याचे लोकार्पण व महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बस सेवेचा शुभारंभ पालकमंत्री डॉ. पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी पालकमंत्र्यांनी भाषणात सांगितले, की स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पहिल्यांदाच या गावात एसटी बस सेवा सुरू झाली असून, पुलांची व रस्त्यांची रुंदी कमी असल्यामुळे गावात बस जाऊ शकत नव्हती; मात्र वन विभागाकडे पाठपुरावा करून रस्त्याची आणि पुलांची रुंदी वाढून घेतली व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत २ कोटी ७२ लाख रुपये पाच किलोमीटर अंतरासाठी निधी उपलब्ध करून दिला. यामुळे एसटी बस सेवा सुरू झाली आहे. आरोग्य, शेती, शिक्षण आणि गावातील इतर सुविधांसाठी ही बस सेवा नक्कीच लाभदायक ठरेल, असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, माजी आ. नारायण गव्हाणकर, माजी आमदार वसंतराव खोटरे, विभाग नियंत्रक, रा.प.म. चेतना खिरवाडकर आणि गावच्या सरपंच लक्ष्मी सुभाष शेळके, स्मिता सुतवणे, अरविंद पिसोळे, संजय आकोन, विश्वास बच्चे, पुंडलिकराव आखरे, श्रीकांत भराटे, सुभाष जैन, रावसाहेब देशमुख, सदाशिव चौहान, गजानन ठाकरे, प्रभू राठोड, सुखनंदन डाखोरे, रवींद्र मरतळकर, अजय लांडे, गोपाल महल्ले, संजय चौधरी व नरेश खंडारे यांची प्रमुख उपस्थिती होती.