राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत बुधवारी जिल्हा स्त्री रुग्णालयात लहान मुलांचा वैद्यकीय स्क्रीनिंग कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. वंदना पटोकार (वसो), जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. आरती कुलवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. उपक्रमांतर्गत लहान मुलांचे दुभंगलेले ओठ, दुभंगलेली टाळू यांचे स्क्रीनिंग करण्यात आले. दिवसभरात १९ चिमुकल्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, त्यांची लवकरच शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक नंदकिशोर कांबळे यांनी दिली.
आठवडाभरात होणार शस्त्रक्रिया
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत बुधवारी १९ बालकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यामध्ये या बालकांचे दुभंगलेले ओठ आणि दुभंगलेले टाळू असल्याचे निदान झाले आहे. या बालकांवर आठवडाभरातच टप्प्याटप्प्याने शस्त्रक्रिया केली जाणार आहे. या सर्व शस्त्रक्रिया अकोल्यातच होणार असल्याचेही जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक कांबळे यांनी सांगितले.
मुलांच्या या आजारावर नि:शुल्क उपचार
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ० ते १८ वर्षे वयोगटातील लहान मुलांवर नि:शुल्क उपचार केले जातात.
मुलांमध्ये हृदयरोग, चिकटलेले बोटे, हर्निया, हायड्रोसील, टंगटाय (जीभ चिकटलेली), कॅन्सर आदी आजार असतील तर पालकांनी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षकांशी संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.