लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : हिंदू बांधवांचे नवदुर्गा देवी विसर्जन, बौद्ध बांधवांचा मोठा उत्सव धम्मचक्र प्रवर्तन दिन, मुस्लीम बांधवांचा मोहरम या तीनही उत्सवानिमित्त शहरात होणार्या गर्दीमुळे वाहतूक शाखेने पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले आहेत. या मार्गाची माहिती नागरिकांसह वाहनचालकांना व्हावी म्हणून वाहतूक शाखेने प्र थमच अनोखी पोस्टरबाजी केली. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनात ही पोस्टरबाजी करण्यात आली आहे.वाहतूक शाखेचे प्रमुख विलास पाटील यांनी वाहतूक शाखेचा पदभार स्वीकारल्यानंतर अनोखे उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून शहरासह ग्रामीण भागातील प्रवाशांना, वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी शहरातील वाहतूक मार्गात बदल करून, त्याचे पोस्टर शहरात लावले आहेत. पोलिसांकडून प्रवासी व वाहनचालकांच्या सुविधेसाठी पोस्टरबाजी केल्याचे हे प्रथमच झाल्याची चर्चा पोलीस खात्यात सुरू आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त जिल्हय़ासह अन्य जिल्हय़ातील बौद्ध बांधव मोठय़ा संख्येने अकोल्यात दाखल होतात, या बौद्ध बांधवांना अकोल्यात येताना वाहतुकीमुळे त्रास होऊ नये म्हणून वाहतूक शाखेचे प्रमुख विलास पाटील यांच्या अनोख्या संकल्पनेतून प्रथमच शहराच्या विविध भागात पोस्टरबाजी करण्यात आली आहे. या पोस्टरबाजीमुळे प्रवासी व वाहनचालकांची गैरसोय होत नसल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
अधिकार्यांकडून पाहणी
धम्मचक्र प्रवर्तन दिन, मोहरम मिरवणूक असलेल्या मार्गाची जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, शहर पोलीस उप अधीक्षक उमेश माने पाटील यांनी मार्गाची पाहणी केली. सोबतच त्यांनी वाहतूक शाखेने राबविलेल्या पोस्टरबाजीचेही कौतुक केले.
पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनातून ही अनोखी संकल्पना साकारण्यात आली आहे. यासाठी रस् त्यावर फलक लावण्यात आले आहेत. बाहेरगाव तसेच बाहेर जिल्हय़ातील येणार्या नागरिकांचा त्रास टाळण्याचा वाहतूक शाखेचा प्रयत्न आहे.- विलास पाटील, प्रमुख, वाहतूक शाखा, अकोला.