अकोला: बदलत्या काळानुसार सौंदर्याच्या मापदंडात बदल होत असून, पूर्वी केवळ नटण्या-थटण्यावर भर देणाºया महिला ‘फिटनेस’वर भर देत आहेत. ब्युटी पार्लर, कापड, दागिन्यांच्या दुकानांकडे वळणारी महिलांची पावले आता ‘फिटनेस’साठी जीमकडे वळत असल्याचे जिल्ह्यातील पहिल्या महिला जीम ट्रेनर असलेल्या देवयानी नरेंद्र अरबट यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.जीम्नेशियम म्हटले की ‘बॉडी बिल्डिंग’ आणि शरीर बळकट करण्यासाठी विविध प्रकारच्या साहित्यांच्या साहाय्याने कसरती करणारे तरुण व त्यांना प्रशिक्षण देणारा पुरुष प्रशिक्षक असे साधारण चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. बहुतांश ठिकाणी हे चित्र पाहावयासही मिळते. अकोल्यातील देवयानी नरेंद्र अरबट यांनी मात्र पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढत जीम ट्रेनिंगच्या व्यवसायात पाय ठेवण्याची हिंमत दाखविली आणि मोठ्या जिद्दीने त्या महिला-पुरुषांना शारीरिक तंदुरुस्तीचे धडे देत आहेत.धकाधकीच्या व स्पर्धात्मक जगात शारीरिक व मानसिकदृष्ट्या ‘फिट’ राहण्यासाठी व्यायाम करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. यासाठी कुणी योगा करतो, तर कुणी जीम जॉइन करतो. जीममध्ये शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी विविध प्रकारच्या कसरतींवर भर दिल्या जातो. मुख्यत: पुरुषांची मक्तेदारी या व्यवसायात आहे. अकोला शहरातील देवयानी अरबट यांनी जुलै २०१६ मध्ये स्वत:चा जीम उघडून या क्षेत्रातील पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढली. महिला संचालक असलेले जीम बरेच असले, तरी स्वत: ट्रेनर म्हणून जीम्नेशियमचे धडे देणाºया देवयानी या अकोला जिल्ह्यातील किंबहुना पश्चिम वºहाडातील पहिल्या महिला असाव्यात. पुणे येथील के-एलेव्हन अकॅडमी आॅफ फिटनेस सायन्स येथे मास्टर ट्रेनर आणि स्पोर्ट न्यूट्रिशनिस्ट पदविका मिळविलेल्या देवयानी अरबट या शास्त्रोक्त पद्धतीने कसरती करण्यावर भर देतात. योग्य आहार आणि व्यायाम केल्याने मनुष्याची शारीरिक व मानसिक क्षमता वाढते व मनुष्य अधिक सकारात्मक होतो. यावर ठाम विश्वास असलेल्या देवयानी अरबट यांच्याकडे जीमसाठी येणाºया महिलांची मोठी गर्दी असते. त्यांच्या जीममध्ये १०० पेक्षा अधिक महिला येतात. आधी केवळ स्थूलता घालविण्यासाठी जीम जॉइन करण्याचा ट्रेंड होता; परंतु आता हा ट्रेंड बदलून ‘फिट’ राहण्यासाठी महिला जीमकडे वळत असल्याचे देवयानी अरबट यांनी सांगितले.पतीचा भक्कम आधारमुळातच ‘फिटनेस’ आणि ‘वेलनेस’कडे ओढा असलेल्या देवयानी यांचा हा पिंड लग्नानंतर काहीसा झाकोळल्या गेला होता. मुले थोडी मोठी झाल्यानंतर मात्र देवयानी यांनी जीम्नेशियमचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. यामध्ये त्यांचे पती नरेंद्र अरबट यांची साथ लाभली. पुणे येथे प्रशिक्षण घेतल्यानंतर व्यवसाय उभारण्यात त्यांना नरेंद्र अरबट यांनी सहकार्य केले. दोन मुले व पती यांचा संसार सांभाळताना त्या व्यावसायिक जबाबदारीही पार पाडत आहेत.