अकाेला
राजेश शेगाेकार
घरात कुस्तीचा ‘क’ जाऊ द्या, पण खेळाच्या ‘ख’चीही चर्चा नाही. आई, वडील दोघांनीही हातमजुरी केल्याशिवाय घरात चूल पेटत नाही. अशा घरांमध्ये मुलाच्या भविष्याची चिंता ती होणार तरी कुठे? रोजची सांज भागली म्हणजे भविष्य संपले; आता उद्याचे उद्या, ‘म्हारी छोरिया छोरे से कम है के’ असे कौतुक करणारा कुणीही ‘महावीर’ नाही अन् कुण्या अमीर खानसारख्या सेलिब्रिटीचा फोकसही त्यांच्यावर पडला नाही. ‘दंगल’ चित्रपट त्यांनी पाहिला नाही. तो चित्रपट पाहण्याचा ‘शौक’ त्यांना परवडत नाही. त्यामुळेच गेल्या एक तपापासून अकोल्याच्या मातीत घाम गाळत ‘दंगल’ गाजविणाऱ्या भूमिकन्यांची कुस्ती ही अक्षरश: गावकुसाबाहेरची दंगल ठरली आहे. दंगल चित्रपट प्रदर्शित झाला आणि देशभरात मुलींच्या कुस्तींची चर्चा सुरू झाली; परंतु अकोल्यात तब्बल एका तपापासून कुस्तीची लाल माती अंगावर घेत मुली मैदान गाजवत आहेत; आणि या मुलींची प्रेरणा हाेत्या पहिल्या महिला वस्ताद सुनीता कडाेळे. गुरुवारी रात्री सुनीता कडाेळे यांचे देहावसान झाले. त्यांच्या रूपाने कुस्तीमधील एक ध्यासपर्व संपले. पण त्यांचा प्रेरणादायी प्रवास हा कुस्तीमध्ये उतरणाऱ्या मुलींसाठीच नव्हेतर, सर्व कुस्तीगीरांसाठी दीपशिखेसारखाच आहे.
सुनीता मोरेश्वर कडोळे यांनी सर्वप्रथम अकोल्यात महिलांकरिता कुस्तीची सुरुवात केली व आज श्री मोरेश्वर महिला कुस्ती प्रशिक्षण संस्थेंतर्गत शेकडो मुली आखाड्यात घाम गाळत आहेत. या मुलींची परिस्थिती हलाखीचीच आहे. पण या मिळून साऱ्या जणींनी कुस्तीत भविष्य शोधले अन् त्यांना हा मार्ग दाखविला पहिल्या महिला वस्ताद सुनीता कडोळे यांनी. अकोल्यातील जवाहरनगर भागातील भाजीपाल्याचे दुकान चालविणारी महिला सुनीता कडोळे. सुनीता यांचे माहेर मध्य प्रदेशातील इंदौरचे. १९९१ मध्ये त्यांचे लग्न झाले. लग्नानंतर पतीला असणारी कुस्तीची आवड हळूहळू सुनीता यांच्यातही निर्माण झाली. अन् पतीच्या मार्गदर्शनात सुनीता यांचा कुस्ती शिकण्याचा प्रवास सुरू झाला. मात्र यातही समाज आणि नातेवाइकांचा मोठा विरोध होताच. सुनीता यांचे पती मोरेश्वर यांना बालपणापासूनच कुस्तीचे प्रचंड वेड. घरची परिस्थिती जेमतेम असतानाच मोरेश्वर यांची कुस्ती प्रचंड बहरली. त्यातूनच मग त्यांनी विभाग, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर आपल्या कुस्तीचा ठसा उमटवत ‘पैलवान’ अशी ओळखही मिळवली. मात्र त्यांची कुस्ती प्रेमाची खरी परीक्षा होती लग्नानंतर. कुस्तीबद्दल आपुलकी असणाऱ्या त्यांच्या पत्नीला त्यांनी कुस्ती शिकविण्याचा आणि कुस्ती खेळविण्याचा निर्णय घेतला होता खरा.. मात्र त्यांच्या या निर्णयाला घरातील आणि समाजातील अनेकांचा मोठा विरोध होता. पण, समाजविरोधाची तमा न बाळगता मोरेश्वर यांनी आपल्या पत्नीला कुस्तीचे धडे द्यायला सुरुवात केली. पुढे या दाम्पत्याला दोन मुले झाली. मात्र सुनीता यांची कुस्ती या काळातही बहरली. आपल्या पतीच्या समर्थ पाठिंब्यामुळे सुनीता यांना ‘कुस्तीपटू’ व ‘महाराष्ट्रातील पहिली महिला वस्ताद’ अशी ओळख मिळाली. मुलींना कुस्तीचे प्रशिक्षण देता यावे म्हणून २००७ मध्ये सुनीता यांनी ‘मोरेश्वर महिला कुस्ती संस्था’ स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांच्याकडे अकोला आणि परिसरातील मुलींनी कुस्तीचे धडे घेतले. यातील अनेक मुली विभाग, राज्य आणि देश पातळीवर कुस्तीमध्ये नाव कमवत पदकांची लयलूट करीत आहेत. २००७ मध्ये सुनीताताईंनी आपली मुलगी माधुरी हिला कुस्तीच्या आखाड्यात उतरविले. माधुरीनेही २००७ मध्ये झालेल्या ‘विदर्भ केसरी’ स्पर्धेत रजत पदक जिंकत आपली छाप पडली. तर २००९ आणि २०१० मध्ये माधुरीने ‘विदर्भ केसरी’ स्पर्धेत सलग दोन वर्षे सुवर्ण पदक पटकावले. काही काळ या दोन्ही माय-लेकी विविध गटांतील अनेक कुस्ती स्पर्धांमध्ये सोबत सहभाग घेत असल्याने अनेकांना या माय-लेकींचे मोठे कौतुक वाटत होते. सुनीता यांच्या खात्यावर सध्या कुस्तीतील अनेक पदके आहेत. यामध्ये २००९ आणि २०१० मध्ये झालेल्या ‘विदर्भ केसरी कुस्ती स्पर्धे’त त्यांनी सलग दोन वर्षे सुवर्ण पदके पटकावली आहेत. याशिवाय त्यांनी आतापर्यंत सात वेळा महाराष्ट्र पातळीवर महिला कुस्तीमध्ये प्रतिनिधित्व केले. या माय-लेकींनी नगर येथे झालेल्या ‘खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धे’त सहभाग नोंदविला हाेता हे विशेष.