मोर्णा धरणावर मत्स्यव्यवसाय करण्याचा आपला अधिकार कायम राहावा, अशी मागणी करीत आई तुळजाभवानी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था व मोर्णा मत्स्यव्यवसाय सोसायटीमध्ये गेल्या २००८ पासून वाद सुरू आहे. मोर्णा मत्स्यव्यवसाय सोसायटीने आई तुळजाभवानी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेची नोंदणी रद्द होण्यासाठी आयुक्तांकडे अपील केले होते; मात्र २४ डिसेंबर २०१९ रोजी अपील फेटाळून लावले होते. आई तुळजाभवानी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेची नोंदणी कायम केली. दरम्यान, मत्स्यव्यवसाय सोसायटीने १५४ अंतर्गत अपील केले. या अपील अधिकाऱ्यांनी ८ फेब्रुवारी २०२१ रोजी आई तुळजाभवानी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेची नोंदणी रद्द करण्याचा आदेश दिला. या आदेशाला आव्हान देण्यासाठी आई तुळजाभवानी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेने उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे धाव घेतली. संस्था नोंदणी रद्दच्या आदेशाला नागपूर उच्च न्यायालय खंडपीठाने १५ फेब्रुवारी २०२१ रोजी स्थगिती देऊन आई तुळजाभवानी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था मर्यादित तुळजापूर, मलकापूर फॉरेस्ट या संस्थेला अधिकार दिला. त्यामुळे आई तुळजाभवानी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेचा मोर्णा धरणासह सर्व जलाशयावर मत्स्यव्यवसायाचा अधिकार कायम झाला. तालुक्यात मोठ्या प्रमाणात धरण, तलाव आणि जलाशय आहेत. आई तुळजाभवानी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेला मासेमारी करण्याचा अधिकार २०१३ पासूनच मिळालेला आहे. या संस्थेमार्फत मोर्णासारख्या मोठ्या जलाशयावर मत्स्यबीज संचयन करून स्थानिक मासेमारांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो, अशी माहिती मत्स्यव्यावसायिक प्रभू मेसरे यांनी ‘लोकमत’ला दिली.
-----------------------------------
दानापूर येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती साजरी
दानापूर : तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून हारार्पण करण्यात आले. या वेळी सरपंच सपना वाकोडे, उपसरपंच सागर ढगे, गोपाल विखे, तसेच ग्रामपंचायतचे सर्व सदस्य गावातील मंडळी व कर्मचारी आदी उपस्थित होते.(फोटो)
------------------------------------------
अडोशी-जोगलखेड रस्त्याची दुरवस्था
बाळापूर : तालुक्यातील अडोशी-जोगलखेड रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. वाहनधारकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. रस्त्यावर खड्डेच खड्डे असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. हा मार्ग पायदळ दिंडी मार्ग असल्याने या मार्गाने वर्दळ सुरूच असते. त्यामुळे संबंधित विभागाने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.