शेषराव शिरसाट
आगर : परिसरातून वाहत असलेल्या मोर्णा नदीच्या पात्रात काही मासे मृत्युमुखी पडल्याने ग्रामस्थांसह पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मासे दूषित पाण्यामुळेच मृत्युमुखी पडल्याची परिसरात चर्चा आहे. मोर्णा नदीपात्र दूषित झाल्यामुळे मासेमारी व्यवसाय धोक्यात सापडला आहे.
मोर्णेच्या पाण्यावर परिसरातील नायगाव, टाकळी जलम, वोकापूर, सुकोडा, सांगवी मोहाडी, भोड, उगवा, सांगवी खु, सांगवी बाजार, फरिमरदाबाद, नवथळ, खेकडी, पाळोदी, गोत्रा, लोणाग्रा, खांबोरा, दुधाळा, मंडाळा आदी गावांसह बाळापूर तालुक्यातील मालवाडा, हातरुण येथील पशुपालक शेतकरी अवलंबून आहेत. कानडी, सुकोडा, आगर येथील मत्स्यव्यवसाय करणाऱ्यांचा उदरनिर्वाह नदीपात्रातील मासेमारीवर अवलंबून आहे. नदीपात्रातील पाणी वाहने बंद झाल्याने मासेमारी व्यवसायाला गती आली होती. कोरोनाच्या काळात संकटात असलेल्या मत्स्यव्यावसायिकांना दिलासा मिळाला होता; मात्र मोर्णा नदीपात्रात माशांचा मृत्यू झाल्याचे दिसून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गत काही दिवसांपासून अकोला शहरातील सांडपाणी मोठ्या प्रमाणात नदीपात्रात वाहते. त्यामुळे नदीपात्रातील पाणी दूषित झाले आहे. या दूषित पाण्यामुळे मासोळ्यांचा मृत्यू झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. नदीपात्रात परिसरातील गुरे, जनावरे पाणी पीत असल्याने शेतकऱ्यांसह पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाला आहे. तसेच कोरोनाच्या काळात संकटात असलेल्या मत्स्य व्यावसायिकांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
------------------------------
उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर
गत आठवड्यापासून नदीपात्रात काळ्या रंगाचे पाणी वाहत आले आहे. यामुळेच माशांचा मृत्यू झाला असावा. तसेच मोर्णा नदीपात्रात माशांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे व्यवसाय धोक्यात आल्याचे मत आगर येथील कैलास धारपवार, प्रल्हाद श्रीनाथ, भिकाजी भालेराव, विष्णू बावणे यांनी व्यक्त केले. मासेमारी व्यवसाय धोक्यात आल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसे करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.