अकोला : महापालिकेच्या शिक्षण विभागात समायोजन प्रक्रियेत अतिरिक्त ठरलेल्या १७ शिक्षकांपैकी पाच शिक्षकांची बदली करण्यात आली आहे. बदली प्रक्रियेला शिक्षण उपसंचालक यांनी हिरवी झेंडी दाखविल्यानंतर बदली प्रक्रियेला वेग आला. महापालिकेच्या शिक्षण विभागात समायोजनाची प्रक्रिया राबविण्यात आली असता, १७ शिक्षक अतिरिक्त ठरले होते. यापैकी १२ कला शिक्षक आहेत, तर उर्वरित पाच कनिष्ठ शिक्षणसेवक होते. शिक्षणाधिकारी शाहीन सुलताना यांनी १७ शिक्षकांच्या बदलीचा प्रस्ताव शिक्षण उपसंचालक अमरावती, यांच्याकडे सादर केला असता, कला शिक्षकांना सामावून घेता येणे शक्य नसल्यामुळे कनिष्ठ पाच शिक्षण सेवकांच्या बदली प्रक्रियेला मंजुरी देण्यात आली. यामध्ये रेखा नागे यांची बाळापूर नगर परिषद, सारिका वैराळे-बाळापूर नगर परिषद, प्रेमकुमार कापरे-तेल्हारा नगर परिषद, पूजा लोखंडे- नगर परिषद चांदूर बाजार, जि. अमरावती आणि चरण घोगरे यांची यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा नगर परिषदेत बदली करण्यात आली. तसे आदेश महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी शुक्रवारी जारी केले. बदली करण्यात आलेले सर्व शिक्षक मराठी माध्यमाचे आहेत, हे येथे उल्लेखनीय.
अतिरिक्त ठरलेल्या १७ पैकी पाच शिक्षकांची बदली
By admin | Published: May 20, 2017 1:42 PM