सचिन राऊत, अकोला : शेअर मार्केट व क्रिप्टो करन्सी मध्ये गुंतवणूक करून दुप्पट मोबदला देण्याचे आमिष दाखवत एक विशिष्ट ॲप मोबाईल मध्ये डाऊनलोड करीत त्या माध्यमातून एका इसमाची सुमारे दीड कोटी रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी पाच आरोपींना अमरावती पोलिसांनी अकोल्यातून अटक केली आहे.
फिर्यादीने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या व्हाट्सअपवर विविध मोबाईल क्रमांकावरून स्क्रिप्टो करन्सी व शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष देण्यात आले. या आमिशाला बळी पडल्यानंतर त्यांना एक लिंक पाठवण्यात आली. या लिंक वरून व्हीआय का नावाचे ॲप डाऊनलोड करण्याचे सांगून, त्यांच्या वेगवेगळ्या अकाऊंट मधून सुमारे एक कोटी 53 लाख 77 हजार 824 रुपये आरोपींनी क्रिप्टो करन्सी व शेअर मार्केटच्या नावाखाली त्यांच्या बँक अकाउंट मध्ये घेतले. व त्यानंतर ही रक्कम विविध 216 बँक अकाउंट मध्ये ट्रान्सफर करून ती रक्कम हडप केली. यामध्ये फिर्यादीची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
यावरून पोलिसांनी तपास सुरू केला असता ही रक्कम बँक अकाउंटधारक कुमारी दक्षता संजय डोंगरे वय 24 वर्षे राहणार अमरावती हिच्याकडे असल्याची माहिती मिळाली. यावरून अमरावती पोलिसांनी तिला अटक करून कसून चौकशी केली असता तिचे बँक अकाउंट अकोल्यातील जिल्हा परिषद कॉलनी म्हाडा कॉलनी येथील रहिवासी शुभम नागेशराव गुलाये वय 23 वर्ष, गौरव शांतीलाल अग्रवाल वय 23 वर्ष रा यशोदा नगर कौलखेड, नमन गजानन डहाके वय 23 वर्षे रिंग रोड कौलखेड व रवी रामसुभाष मोर्या वय 33 वर्षे राजू नगर कौलखेड हिंगणा फाटा यांनी वापरल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी या चारही आरोपींना अकोल्यातून अटक केली असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. या आरोपींकडून पासबुक, एटीएम कार्ड 20, सिम कार्ड 17, एसडी कार्ड तसेच पाच मोबाईल व हँडसेट जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई अमरावती शहर पोलीस आयुक्त यांच्या पथकाने केली.