अकोला: उरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कंचनपूर-मांजरी शिवारात रात्र गस्तीवर असणाऱ्या पोलिसांच्या वाहनावर फायरिंग करणाऱ्या पाच हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून शस्त्र व गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटरसायकली जप्त करण्यात आल्याची माहिती रविवारी पत्रकार परिषदेत जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी दिली.
उरळ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कंचनपुर-मांजरी ते हातरून परिसरात ३० डिसेंबर २०२३ च्या रात्री गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना या मार्गावर दोन मोटरसायकलींवर संशयित व्यक्ती फिरत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी दोन्ही मोटरसायकलचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असता हल्लेखोरांनी पोलिसांच्या वाहनावर ताबडतोब फायरिंग केली. तसेच अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पसार झाले. पोलिसांच्या वाहनावर फायरिंग झाल्याच्या घटनेमुळे जिल्हाभरात खळबळ उडाली होती. अंधाराचा फायदा घेऊन पसार झालेल्या हल्लेखोरांना पकडण्याचे अकोला पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले होते. १३ दिवसानंतरही आरोपींचा सुगावा लागत नसल्याचे पाहून आम्ही माहिती देणाऱ्यास २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
अखेर रविवारी पहाटे नखेगाव येथून पाचही हल्लेखोरांच्या मुसक्या आवळण्यात यश आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी दिली. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले शस्त्र तसेच दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून त्यांचा इतर गुन्ह्यात सहभाग आहे का? या दिशेने कसून चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सिंह यांनी दिली. पत्रकार परिषदेला अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, बाळापूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळ राज, 'एलसीबी' प्रमुख शंकर शेळके, आदी उपस्थित होते.
पोलिसांवरील हल्ले सहन करणार नाहीसदर आरोपी हरीण, रानडुक्कर, ससा आदी वन्यजीवांची शिकार करण्यासाठी या परिसरात फिरत होते, अशी गोपनीय माहिती 'एलसीबी' ला मिळाली. घटनेच्या दिवशीही ते शिकारीसाठीच या परिसरात फिरत होते. दरम्यान, पोलिसांवरील हल्ले कदापी खपवून घेणार नसल्याचा इशारा पोलीस अधीक्षक सिंह यांनी दिला.
'एनसीबी' ने राबवले सर्च ऑपरेशनस्थानिक गुन्हे शाखाप्रमुख शंकर शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भगत, दहिहांडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश वाघमारे, 'एलसीबी'चे उपनिरीक्षक गोपाल जाधव यांच्यासह २८ अंमलदारांनी शनिवारी संपूर्ण दिवस व रविवारची पहाट उजाडेपर्यंत सर्च ऑपरेशन राबविले. अखेर अश्विन गणेश मुंडे (२१), भावेश उर्फ अर्जुन रवींद्र मुंडाले (१९), अविनाश भिमराव मुंडाले (२६), योगेश रामराव मुंडाले (२६) सर्व राहणार नखेगाव तसेच सागर ज्ञानेश्वर चौके (२५) राहणार नेरधामणा या पाच जणांना अटक करण्यात आली.